पुस्तके जीवनाचा अविभाज्य भाग : मेधा कुलकर्णी; ‘शून्य उत्तराची बेरीज’चे पुण्यात प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:00 PM2018-01-31T15:00:59+5:302018-01-31T15:04:13+5:30
पुस्तके हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. उन्मेष प्रकाशनातर्फे प्रसिद्ध सतारवादक जया जोग लिखित ‘शून्य उत्तराची बेरीज’ या लघुकादंबरीचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
पुणे : ‘वाचनातून सर्जनशीलता, कल्पकतेला नवे धुमारे फुटतात. पुस्तकांमध्ये कल्पनेचे सामर्थ्य विस्तारते. माणसाची जडणघडण करणारी पुस्तके हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
उन्मेष प्रकाशनातर्फे प्रसिद्ध सतारवादक जया जोग लिखित ‘शून्य उत्तराची बेरीज’ या लघुकादंबरीचे प्रकाशन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी राघवेंद्र जोशी आणि मेधा राजहंस उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘आयुष्याच्या विविध टप्प्यांवर माणसे आणि नातेसंबंध बदलत असतात. जोग यांच्या लेखनामध्ये परिस्थिती आणि मन:स्थिती यांचा समन्वय साधला आहे. यातून लेखनाची प्रेरणा मिळते.’
जोशी म्हणाले, ‘समृध्द घरात जन्माला आलेल्या मुलीच्या आयुष्याची वाताहत उत्तम रेखाटली आहे. शून्य उत्तराची बेरीज असे गणित कोणीच शिकवले नाही. बेरीज म्हटल्यावर त्यामध्ये अधिक पडायला हवे, एवढेच आजपर्यंत शिकवले गेले.’
जया जोग यांनी मनोगत व्यक्त केले. मेधा राजहंस यांनी प्रास्ताविक केले. नाद संस्थेच्या विद्यार्थिनी प्रज्ञा मेने, ऐश्वर्या भावे आणि मानसी दांडेकर यांनी सतारवादनातून जोग यांच्या रचना सादर केल्या.