पुणे महापालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके; रात्र व अंधशाळेच्या विद्यार्थ्यांनाही लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 07:59 PM2021-07-06T19:59:48+5:302021-07-06T20:00:49+5:30
विविध विषयांच्या एकूण ९४ हजार ५५४ पुस्तक खरेदीसाठी ५० लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार रात्र आणि अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनाही देणार लाभ
पुणे : पालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या तसेच पालिकेच्या हद्दीतील अंध शाळांमधील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली क्रमिक पुस्तके देण्यात येणार आहेत. विविध विषयांच्या एकूण ९४ हजार ५५४ पुस्तक खरेदीसाठी ५० लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. ही रक्कम बालभारती संस्थेला अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
याबाबत माहिती देताना रासने म्हणाले, सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासन मोफत पुस्तके देते. मागील चार वर्षांपासून आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या आणि मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना पालिका पुस्तके पुरवित आहे. यावर्षी देखील बालभारतीकडून पुस्तके खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
====
दोन वर्षांपासून पालिका हद्दीतील रात्रशाळेत शिकणाऱ्या नववी आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत विनामूल्य पुस्तके दिली जातात. पालिकेच्या नी. वा. किंकर रात्रशाळा, पूना नाईट स्कूल, शुक्रवार पेठ आणि आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला, सोमवार पेठ या तीन शाळांतील विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जाणार आहेत. रात्रशाळेतील मराठी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ३ हजार ६३२ पुस्तके खरेदी करण्यात येणार आहेत.
===
माध्यम पुस्तकांची संख्या
मराठी ४७ हजार ७८७
उर्दू १२ हजार २४२
इंग्रजी ३४ हजार ५२५
एकूण ९४ हजार ५५४