पुस्तकांमुळे होते मन आणि बुद्धीचे भरण-पोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:13 AM2021-06-16T04:13:00+5:302021-06-16T04:13:00+5:30
पुणे : जीवनातल्या कसोटीच्या प्रसंगात पुस्तके माणसाला मार्ग दाखवतात आणि त्याचे जीवन समृद्ध आणि संपन्न करतात. पुस्तकांमुळे माणसाच्या मन ...
पुणे : जीवनातल्या कसोटीच्या प्रसंगात पुस्तके माणसाला मार्ग दाखवतात आणि त्याचे जीवन समृद्ध आणि संपन्न करतात. पुस्तकांमुळे माणसाच्या मन आणि बुद्धीचे भरण-पोषण होते. चांगली पुस्तके गुरू, मार्गदर्शक आणि मित्र म्हणून भूमिका बजावतात. पुस्तकांशी अतूट मैत्री झाली तर माणसाचे जीवन चांगल्या वळणावर जाते. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे नव्या पिढीचे वाचन हा चिंतेचा विषय असून त्यांना वाचनात रमवणे हे शिक्षक, पालकांसमोरचे मोठे आव्हान आहे, असे मत भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी व्यक्त केले.
गोल्डन पेज पब्लिकेशनच्या वतीने डॉ. वैभव ढमाळ यांच्या ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक डॉ. वैभव ढमाळ, प्रकाशक प्रदीप खेतमर उपस्थित होते.
प्रा. जोशी म्हणाले, ''विचारसृष्टीचे अवलोकन केल्याशिवाय जीवनदृष्टी मिळत नाही. चांगल्या ग्रंथांच्या वाचनातून ती मिळते. मनाची मशागत आणि अंतरीच्या ज्ञानदीपाचे प्रज्वलित होणे ज्या विचारांमुळे घडते त्या विचारांचे उगमस्थान ग्रंथात असते. चांगले पुस्तक एकांतात वाचताना त्या पुस्तकातल्या अनुभवांशी एकरूप होताना शब्दांच्या सोबतीने माणूस शब्दांच्या पलीकडे जातो. अनेकदा नि:शब्द होतो. शब्दांपेक्षाही नि:शब्द जाणिवांचे महत्त्व अधिक आहे.''
डॉ. ढमाळ यांनी पुस्तकामागील भूमिका सांगितली. प्रदीप खेतमर यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.