पुस्तके अडकली ‘आयएसबीएन’च्या चक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:44+5:302021-03-16T04:11:44+5:30

नम्रता फडणीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनामुळे ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिलेली स्थगिती, ग्रंथ प्रदर्शनाद्वारे होणाऱ्या ...

Books stuck in ISBN's cycle | पुस्तके अडकली ‘आयएसबीएन’च्या चक्रात

पुस्तके अडकली ‘आयएसबीएन’च्या चक्रात

Next

नम्रता फडणीस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिलेली स्थगिती, ग्रंथ प्रदर्शनाद्वारे होणाऱ्या पुस्तक व्यवहाराला बसलेली खीळ, ग्रंथालयांचे थकलेले अनुदान, ग्रंथालयांकडून पुस्तकांची रखडलेली खरेदी, असे प्रकाशन व्यवसायांच्या मागे एकामागून एक शुक्लकाष्ट लागले आहे. त्यात आता पुस्तकांसाठी आवश्यक असणाऱ्या इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर (आयएसबीएन)च्या विलंबाची भर पडली आहे. केंद्राच्या राजा राममोहन रॉय नॅशनल एजन्सीच्या संकेतस्थळाचे नूतनीकरण केल्यामुळे ही प्रक्रिया अधिकच किचकट केली आहे. पुस्तक नोंदणीची सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही प्रकाशकांना आयएसबीएन क्रमांकासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. यामुळे नवीन दर्जेदार पुस्तके वाचकांसाठी तयार असूनही, ती या ‘आयएसबीएन’च्या प्रक्रियेत अडकली आहेत.

एखादे पुस्तक छापण्यासाठी, ऑनलाइन विक्रीस देण्यासाठी, ग्रंथालयांना पुस्तक खरेदी करण्यासाठी अथवा लेखकाच्या पुस्तकातील कथा किंवा तत्सम मजकूर एखाद्या अभ्यासक्रमाला लावण्याकरिता देण्यासाठी प्रकाशकांकडे पुस्तकासंबंधीचा इंटरनॅशनल स्टँडर्ड बुक नंबर (आयएसबीएन) असणे बंधनकारक आहे. त्याकरिता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्चशिक्षण विभागांतर्गत राजा राममोहन रॉय नॅशनल एजन्सी नियुक्त केली आहे. या एजन्सीच्या पोर्टलवर प्रकाशकांना पुस्तकांची नोंदणी करणे गरजेचे आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात नूतनीकरणामुळे हे संकेतस्थळ काही महिने बंद होते आणि आता जरी ते पूर्ववत सुरू केले असले, तरी नोंदणीच्या किचकट प्रक्रियेमुळे प्रकाशकांना आयएसबीएन क्रमांक सहजरीत्या आणि तातडीने मिळणे अवघड झाले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करूनही आयएसबीएन क्रमांक मिळत नसल्याचे प्रकाशकांकडून सांगण्यात आले आहे.

--

कोणतंही पुस्तक हे आयएसबीएन क्रमांकाशिवाय छापले जाऊ शकत नाही. गेल्या सहा महिन्यांपासून आयएसबीएनच्या संकेतस्थळाबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या साइटवर लॉगिन करून क्रमांकासाठी अप्लाय करावे लागते. त्याकरिता पुस्तकांची संपूर्ण माहिती टाकल्यानंतर लगेचच आयएसबीएन क्रमांक दिला जातो. जगभरात आयएसबीएन क्रमांक हा खूप महत्त्वाचा असून, या क्रमाकांवर तुमच्या पुस्तकाची नोंदणी होते. हा क्रमांक न मिळाल्यामुळे देशभरात लाखो पुस्तके रखडली आहेत. आमची शंभर पुस्तके तयार आहेत, पण क्रमांक मिळाल्याशिवाय ही पुस्तके प्रकाशित करू शकत नाही.

- योजना यादव, प्रॉडक्शन हेड, मेहता पब्लिकेशन हाउस

--

आमच्या प्रकाशनाची जवळपास पन्नास पुस्तके आली आहेत. अनेक नव्या दर्जेदार पुस्तकांची आम्ही दमदारपणे तयारी करून ठेवलीय. अनेक पुस्तकांच्या प्रकाशनाचे नियोजन झालंय, परंतु मागील एक महिन्यापासून पुस्तकांचे आयएसबीएन क्रमांक मिळत नाहीत. पूर्वी एका दिवसात आयएसबीएन क्रमांक मिळायचे. आता या संकेतस्थळाचे नूतनीकरण केले असून, अनेक किचकट बदल केले आहेत. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने, आम्हा प्रकाशकांकडून जीएसटी लायसन्सची कॉपी, शॉप ॲक्टची कॉपी सर्व मागविली जात आहे. त्याचीही आम्ही पूर्तता केली आहे. त्यानंतर, नवीन लॉगिन देण्यात आले. त्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही आयएसबीएन क्रमांक मिळत नाहीये.

- घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन

Web Title: Books stuck in ISBN's cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.