अत्याधुनिक यंत्रणेमुळे पुस्तके होणार सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 07:12 PM2018-03-27T19:12:48+5:302018-03-27T19:12:48+5:30
संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ग्रंथालयातील पुस्तकांसाठी ‘आरएफआयडी’ ही अत्याधुनिक प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारी भांडारकर संस्था ही केवळ पुण्यातीलच नव्हे तर भारतातील पहिली प्राच्यविद्या संशोधन संस्था ठरणार आहे.
पुणे : ग्रंथपालाला दुूर्मिळ पुस्तकाचे नाव सांगितल्यावर त्यांनी अत्याधुनिक उपकरणाच्या साहाय्याने कोणत्या खोलीत, कोणत्या रॅकमध्ये ते मिळेल, हे काही क्षणात सांगितले..ग्रंथालयातून आणलेले पुस्तक परत करण्याच्या तारखेचा मेसेज आला किंवा एखादी व्यक्ती नोंद न करता पुस्तक घेऊन बाहेर पडत असताना सायरन वाजला तर ! या सर्व कल्पना भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमध्ये लवकरच वास्तवात अवतरणार आहेत. संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तकांच्या देखभालीसाठी रेडिओ फ्रिक्वेन्टेड आयडेंटिफिकेशन डिव्हाईसचा वापर केला जाणार आहे.
भांडारकर संस्थेच्या डॉ. रा.ना.दांडेकर ग्रंथालयात सुमारे १,३८,००० पुस्तकांचा अनमोल ठेवा उपलब्ध आहे. कालानुरुप बदल करत असताना डिजिटल लायब्ररीची संकल्पना पुढे आली. त्याप्रमाणे पुस्तकांचा कॅटलॉग तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. डिजिटायझेशनचा पुढील टप्पा म्हणून आरएफआयडी ही नवी संकल्पना अस्तित्वात आणली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक पुस्तकाला मायक्रोचिप बसवण्याचे काम सुरु असून, सेन्सरच्या सहाय्याने पुस्तकांच्या नोंदी ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे पुस्तके गहाळ होणे, पुस्तकांची चोरी अशा प्रकारांना आळा बसणार आहे.
संस्थेच्या ग्रंथालयामध्ये वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत, आयुर्वेद यांसह विविध विषयांवरील सुमारे एक लाख ३० हजार पुस्तकांचा संग्रह आहे. वेगवेगळ्या विषयांवरील अनमोल ठेवा सुरक्षितपणे जतन करण्याच्या उद्देशातून संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ग्रंथालयातील पुस्तकांसाठी ‘आरएफआयडी’ ही अत्याधुनिक प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारी भांडारकर संस्था ही केवळ पुण्यातीलच नव्हे तर भारतातील पहिली प्राच्यविद्या संशोधन संस्था ठरणार आहे.
परदेशातील ग्रंथालयांमध्ये 'आरएफआयडी' ही प्रणाली उपयोगात आणली जात असून त्याला यश मिळाले आहे.त्यामुळे या प्रणालीचा वापर करुन संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे जतन केले जावे, यासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ठराविक निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यासाठी आॅनलाईन निविदा काढण्यात असून, त्याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल , अशी माहिती संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
‘आरएफआयडी’ प्रणालीअंतर्गत प्रत्येक पुस्तकामध्ये एक मायक्रोचीप बसविली जाते. त्या चीपला असलेल्या सेन्सरमुळे ग्रंथालयात जाणारी व्यक्ती जसजशी पुस्तकाजवळ जाईल तसा त्या पुस्तकातील चीपचा आवाज मोठा होत जाईल आणि वाचकाला ते पुस्तक नेमके कोठे आहे हे समजू शकेल, असे अशी माहिती दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनचे काम पाहणारे डॉ. सुधीर वैशंपायन यांनी दिली.
आरएफआयडीच्या वापरामुळे वाचकांना घर बसल्या, त्यांना हवे असलेले पुस्तक सध्या ग्रंथालयामध्ये आहे किंवा ते कोणाकडे आहे याची माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे पुस्तक घेण्यासाठी ग्रंथालयात येण्याचा त्यांचा हेलपाटा वाचू शकेल. त्याचप्रमाणे ग्रंथालयामध्ये पुस्तक उपलब्ध असेल तर, वाचकाला ‘एसएमएसद्वारे कळवण्याची सुविधा देणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वाचकांना लेखकानुसार, विषयानुसार, शीर्षकानुसार पुस्तक शोधता येणार आहे, असेही वैशंपायन यांनी सांगितले.