पीएमपीसाठी ३९२ कोटींचा बुस्ट

By admin | Published: March 31, 2017 03:09 AM2017-03-31T03:09:03+5:302017-03-31T03:09:03+5:30

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला पुणे महापालिकेकडून ३९२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

A boost of Rs 392 crore for PMP | पीएमपीसाठी ३९२ कोटींचा बुस्ट

पीएमपीसाठी ३९२ कोटींचा बुस्ट

Next

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला पुणे महापालिकेकडून ३९२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये नवीन बसखरेदी, आर्थिक संचलनातील तूट भरून काढणे, बस डेपो व टर्मिनल विकसित करणे, बीआरटी मार्गाची उभारणी आदी विकासकामे यातून केली जाणार आहेत.
पीएमपी हा पुणेकरांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी एकत्र येऊन पीएमपीच्या संचलनासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ ही कंपनी स्थापन केली आहे. दोन्ही महापालिकांकडून पीएमपीच्या पायाभूत सुविधा व संचलनासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.
पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये पीएमपीसाठी ३९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. नवीन बस खरेदीसाठी १६४ कोटी रुपयांचा महापालिकेकडून दिला जाणार आहे. शहरातील पीएमपी बसचे डेपो व टर्मिनल विकासासाठी ३१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आर्थिक तूट संचलनासाठी १६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. पीएमपी स्वतंत्र कंपनी झाली असली तरी ती तोट्यात असल्याने ही तूट भरून काढण्यासाठी दर वर्षी पालिकेकडून पीएमपीला अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
पुढील वर्षभरात पीएमपीच्या ताफ्यात नवीन १५५० बस दाखल होणार आहेत, त्यानंतर हे प्रमाण सुधारू शकेल. नवीन बस आल्यानंतर ३७० मार्गांवर बसची वारंवारता वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर एसी बसमुळे आरामदायी प्रवास करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असण्यासाठी प्रतिलक्ष लोकसंख्येमागे ५० बस असणे आवश्यक आहे. मात्र सध्या पुण्याची लोकसंख्या व पीएमपीच्या बसची संख्या पाहता हे गुणोत्तर प्रतिलक्ष लोकसंख्येमागे ३२ बस इतकेच आहे.

पीएमपीसाठी २० वर्षांचा बिझनेस प्लॅन
पीएमपीच्या पुढील २० वर्षांचा बिझनेस प्लॅन तयार करण्यासाठी एका संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेकडून महामंडळाच्या सर्व विभागाचा अभ्यास केला जात आहे. त्याचबरोबर रूट रॅशनलायझेशन करून आर्थिक खर्च कमी करणे व उत्पन्न वाढविणे, यावर भर दिला जाणार आहे.
नवीन बस एप्रिल-मे मध्ये
पीएमपीकडून आगामी वर्षभरात १५५० बसची खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील बस मे-जून २०१७ मध्ये दाखल होणार असल्याची माहिती अंदाजपत्रकामध्ये देण्यात आली आहे.
औंध, सातारा रस्ता व जुना मुंबई-पुणे हायवे या तीन मार्गांवर बीआरटीची उभारणी करण्यात येत आहे. २०१७ पर्यंत ४६ किमी बीआरटी मार्गाची उभारणी केली जाणार आहे. बस सेवेच्या सुधारणेसाठी जीपीएस बसविणे, पीएमपीच्या वेळापत्रकाचे अ‍ॅप तयार करणे आदी सुधारणा केल्या जात आहेत. मी कार्डचा वापर जास्तीत जास्त वाढविण्यावर पुढील वर्षात भर दिला जाणार आहे.

Web Title: A boost of Rs 392 crore for PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.