Pune: सुतार दवाखान्यात ‘पीपीपी’ला पायघड्या; ओपीडी विभागाला काेपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:48 AM2023-07-15T11:48:43+5:302023-07-15T11:50:02+5:30
आराेग्य विभागाला आवडे ‘पीपीपी माॅडेल’ची हवा...
- ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : महापालिकेच्या आराेग्य विभागाची काेथरूड येथील कै. जयाबाई नानासाहेब सुतार हाॅस्पिटल, प्रसूतिगृह आणि मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलची रुग्णसेवा नावालाच शिल्लक राहिली आहे. येथील दर्शनी भागातील, माेक्याची दुमजली जागा ‘पीपीपी’ तत्त्वावर चालविण्यास दिलेल्या क्रस्ना डायग्नाेस्टिक व पॅथाॅलाॅजी विभागाने व्यापली आहे, तर महापालिकेची ओपीडी, प्रसूतिगृह, ऑपरेशन थिएटर ही रुग्णांसाठी महत्त्वाची सेवा इमारतीच्या मागच्या बाजूला एका काेपऱ्यात सुरू आहे. मग हा महापालिकेचा दवाखाना आहे की खासगी कंपनीचा हा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
महापालिकेच्या आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांनी ‘पीपीपी माॅडेल’च्या नावाखाली खासगीकरणाला मागच्या दाराने दिलेल्या प्राेत्साहानाचे आता दुरगामी परिणाम दिसून येत आहेत. येथून महापालिकेची सर्वसामान्यांसाठी असलेली आराेग्यसेवाच हद्दपार हाेण्याची वेळ आली आहे, तर ती माेक्याची जागा कंपन्या, ठेकेदार यांना पायघड्या घातल्याने त्यांनी तेथे आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी सुतार दवाखान्यात प्रवेश करताच तेथील सुसज्ज अशा दुमजली इमारतीवर असलेल्या ‘पुणे महानगरपालिका कै. जयाबाई नानासाहेब सुतार मॅटर्निटी हाॅस्पिटल, कै. नानासाहेब सुतार दवाखाना आणि कै. शंकरराव धाेंडिबा सुतार मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल या नावाची अक्षरे लक्ष वेधून घेत. परंतु, ती अक्षरे उतरून आता तेथे आता क्रस्ना डायग्नाेस्टिकचा माेठ्या अक्षरातील बाेर्ड लागला आहे. तसेच ही इमारत काचांनी सजवून तिला काॅर्पोरेट लूक दिला आहे. समाेरील दाेन्ही मजले क्रस्ना डायग्नाेस्टिकची पॅथाॅलाॅजी लॅब, एमआरआय, साेनाेग्राफी, सिटी स्कॅन सेंटर यांना मुक्तहस्ते वापरायला दिली आहे, तर पहिल्या मजल्यावरील एक कक्ष हा नावालाच काेविड लसीकरणासाठी आहे.
काेपऱ्यात भरते महापालिकेची ओपीडी
महापालिकेच्या सुतार दवाखान्याची ओपीडी म्हणजे बाह्यरुग्ण विभाग या इमारतीच्या पाठीमागे एका काेपऱ्यातील कक्षात भरत आहे. ती ठळकपणे लक्षात देखील येत नाही. ओपीडी पाठीमागे असल्याचा ठसठशीत फलकही तेथे लावलेला नाही. समाेर इमारतीला काॅर्पाेरेट लूक तर पाठीमागे त्याच्याविरुद्ध परिस्थिती आहे. येथील ओपीडीला साधी फरशीदेखील नाही. फुटपाथच्या ठाेकळ्यांमध्ये रुग्णांसाठी प्रतीक्षालय आहे. महापालिकेच्या मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयातही अशीच परिस्थिती आहे.
जागा, पाणी, वीजपुरवठा महापालिकेचा नफा कंपनीचा
महापालिकेच्या आराेग्य विभागातील काही अधिकाऱ्यांनी पाच ते सात वर्षांपूर्वी अनेक कंपन्यांना ‘पीपीपी माॅडेल’द्वारे आपलेसे केले. त्यांना महापालिकेने बांधलेल्या सुसज्ज इमारती, पाणी व वीज कनेक्शन माेफत दिले. कंपनीने फक्त आपले मशीन व मनुष्यबळ आणले आणि त्यांना महापालिकेचे सर्व रुग्णही मिळाले. आज या कंपन्या महापालिकेने दिलेल्या माेफत जागा, पाणी, वीज कनेक्शनच्या जीवावर काेट्यवधी रुपयांचा नफा कमवत आहेत. यातील काही टक्केवारी आराेग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या व कारभाऱ्यांच्या खिशात जमा हाेत असल्याने सर्वकाही आलबेल सुरू आहे, असा आरोप आराेग्य क्षेत्रातील कार्यकर्ते करीत आहेत.
सुतार दवाखान्याची ओपीडी मागच्या बाजूस आहे. प्रथमदर्शनी नागरिकांना दिसत नाही. दवाखान्याचे प्राइम लाेकेशन मात्र क्रस्ना डायग्नाेस्टिकला दिले. काही लाेकांच्या हितसंबंधामुळे त्यांना फेव्हरेबल हाेईल, अशी जागा दिली. मागच्या बाजूस ओपीडी, प्रसूतीगृह आहे; परंतु, तातडीचे सिझेरियन सेक्शन नाही. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही सुविधा नाही व खासगीकरणाचा मात्र उदाे- उदाे केला आहे.
- डाॅ. अभिजित माेरे, आप, पुणे शहर उपाध्यक्ष
सुतार दवाखान्याची ओपीडी, प्रसूतिगृह निश्चितच समाेरच असायला हवेत. याबाबत अधिक माहिती घेण्यात येईल. पेशंटच्या हितासाठी जाे काही याेग्य निर्णय आहे ताे घेण्यात येईल.
- डाॅ. भगवान पवार, आराेग्यप्रमुख, पुणे मनपा