बोपदेव घाटात वाहनचालकांना लुटणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:10 AM2021-04-13T04:10:18+5:302021-04-13T04:10:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटात वाहनचालकांना अडवून लुटणारी टोळी कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात अडकली. चोरट्यांकडून दुचाकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बोपदेव घाटात वाहनचालकांना अडवून लुटणारी टोळी कोंढवा पोलिसांच्या जाळ्यात अडकली. चोरट्यांकडून दुचाकी चोरीसह लुटमारीचे दहा गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून सात दुचाकी तसेच मोबाइल संच असा दहा लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ओंकार हिंदूराव शिरतोडे, दीपक बाबा भंडलकर, ॠषीकेश प्रल्हाद बोंडरे (तिघे रा. खुंटे, ता. फलटण, जि. सातारा) अभिजीत उर्फ आबा अंकुश जाधव (रा. चौधरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरट्यांबरोबर लुटमारीचे गुन्हे करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. ४ एप्रिल रोजी सासवडहून बाळासाहेब भिंताडे आणि त्यांची पत्नी वैजयंती (रा. धनकवडी) दुचाकीवरुन पुण्याकडे येत होते. बोपदेव घाटात रात्री एका वळणावर आरोपी शिरतोडे, भंडलकर, बोेंडरे, जाधव आणि अल्पवयीन साथीदारांनी दुचाकीवरील भिंताडे दाम्पत्याला अडवले. त्यांना धमकावून त्यांच्याकडील ऐवज काढण्यास सांगितला. त्यानंतर भिंतांडे यांच्याकडील मोबाइल संच हिसकावून चोरटे पसार झाले.
भिंताडे यांनी याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात घडला होता. तपास पथकाने चोरट्याने माग काढण्यास सुरुवात केली. चोरटे फलटण परिसरातील असल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक या भागात वेशांतर करून थांबले होते. आरोपी आणि अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे शाखेतील निरीक्षक शब्बीर सय्यद, चेतन मोरे, प्रभाकर कापुरे, निलेश वणवे, सुदाम वावरे, संजीव कळंबे, ज्योतीबा पवार, किशोर वळे, अभिजीत रत्नपारखी आदींनी ही कारवाई केली. चोरट्यांनी कोंढवा, दत्तवाडी तसेच सासवड, बारामती, कराड भागात गुन्हे केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.