कंटाळा आलाय ?; आता घरबसल्या करा, राजा दिनकर केळकर संग्रहालयाची सफर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 11:39 AM2020-03-27T11:39:53+5:302020-03-27T11:50:07+5:30
घरबसल्या लोकांना संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू पाहता याव्यात यासाठी बाजीराव रस्त्यावरील राजा दिनकर केळकर संग्रहालयाने एक अभिनव प्रयोग केला आहे.थ्रीडी व्हर्च्युअल टूरच्या माध्यमातून लोकांना संग्रहालयाची वेगळ्या प्रकारे सफर घडविली जात आहे.
पुणे : कोरोनामुळे सध्या सर्वजण होम क्वांरंटाईन आहेत. शहरातील सर्व व्यवहार ठप्प असून, वस्तू संग्रहालय देखील बंद आहेत. या दोन्हीचा मेळ साधत घरबसल्या लोकांना संग्रहालयातील दुर्मिळ वस्तू पाहता याव्यात यासाठी बाजीराव रस्त्यावरील राजा दिनकर केळकर संग्रहालयाने एक अभिनव प्रयोग केला आहे.थ्रीडी व्हर्च्युअल टूरच्या माध्यमातून लोकांना संग्रहालयाची वेगळ्या प्रकारे सफर घडविली जात आहे.
या प्रयोगामध्ये संग्रहालयाचे थ्रीडी माध्यमात शूट करण्यात आले असून, त्याची लिंक सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. या लिंकवर क्लिक केल्यावर संग्रहालयाचे थ्रीडीतून दर्शन घडत आहे.
हे थ्रीडी शूट डॉ. श्रीकांत केळकर यांनी केले आहे. या माध्यमातून संग्रहालयातील सर्व दुर्मिळ वस्तूंसह संग्रहालय कसे आहे हे पाहाणे शक्य होत आहे. या प्रयोगाला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून, संग्रहालयाचे वेगळे रूप यातून लोकांसमोर थ्रीडी स्वरूपात समोर आले आहे.
या नाविन्यपूर्ण प्रयोगाची माहिती संग्रहालयाचे संचालक सुधनवा रानडे यांनी दिली.ते म्हणाले, सध्या संग्रहालय बंद असल्यामुळे लोकांना दुर्मिळ वस्तूंचा हा नजराणा पाहता येत नाही आहे. त्यामुळे त्यांना घरी बसल्या संग्रहालयाची अनोखी भ्रमंती करता यावी म्हणून आम्ही हा आगळा-वेगळा प्रयोग राबविला आहे. संग्रहालयाला लोक प्रत्यक्ष भेट देतातच. पण, आता कोरोनामुळे ते शक्य नाही. म्हणून हे माध्यम आम्ही शोधले आहे. आम्ही ही लिंक व्हॉट्सऍपवर शेअर करत असून, लोकांना त्याद्वारे संग्रहालय घरबसल्या पाहायला मिळत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
https://my.matterport.com/show/?m=VavyUHG166x&help=2&play=1&dh=1&nozoom= या लिंकवर लोकांना संग्रहालयाचा घरबसल्या आस्वाद घेता येईल.