नगर अर्बन बॅंक फसवूणक प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:12 AM2021-03-10T04:12:38+5:302021-03-10T04:12:38+5:30
पिंपरी : नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूकप्रकरणी सोमवारी (दि.८) अटक केलेल्या दोघांना मंगळवारी (दि.९) मोरवाडी, पिंपरी येथील ...
पिंपरी : नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूकप्रकरणी सोमवारी (दि.८) अटक केलेल्या दोघांना मंगळवारी (दि.९) मोरवाडी, पिंपरी येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना सोमवार, दि. १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच याच प्रकरणात यापूर्वी पोलीस कोठडीत असलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
आशुतोष सतीश लांडगे (वय ३८, रा. अहमदनगर), जयदीप प्रकाश वानखेडे (वय ३४, रा. पुणे, मूळ रा. श्रीरामपूर), असे पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी नवनीत शांतीलाल सूरपुरिया (वय ५५, रा. अहमदनगर) आणि यज्ञेश बबन चव्हाण (वय २५, रा. संभाजीनगर, चिंचवड) या दोघांना अटक केली होती. सूरपुरिया आणि चव्हाण या दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत (दि.९) पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांनाही मंगळवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर अर्बन बँक फसवणूकप्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (वय ५६, रा. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली आहे. बँकेच्या चिंचवड येथील शाखेत २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान फसवणुकीचा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.