सहा कोटींच्या रक्तचंदन वाहतूक प्रकरणात दोघांना जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:13 AM2021-08-28T04:13:28+5:302021-08-28T04:13:28+5:30
पुणे : बेकायदेशीरपणे साडेसहा किलोची रक्त चंदनाची वाहतूक केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. सत्र ...
पुणे : बेकायदेशीरपणे साडेसहा किलोची रक्त चंदनाची वाहतूक केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. सत्र न्यायाधीश प्रदीप अष्टुरकर यांनी हा निकाल दिला आहे.
विनोद प्रकाश फर्नांडीस (वय ४५) आणि निर्मलसिंग ऊर्फ मिन्टो मंजितसिंग गिल (वय २६ , दोघेही, रा. नवी मुंबई) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ॲड. गणेश भूमकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. ॲड. भूमकर यांना ॲड. बंटी गायकवाड, ॲड. मिलिंद डोंबे, ॲड. योगेश बावीकर, ॲड. अमजद खान, सिध्दार्थ धेंडे यांनी मदत केली. याबाबत पोलीस नाईक वंदू गिरे यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीला संशयितरित्या एक कार पार्क केलेली दिसली. दोघांची चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी एकाचा मोबाईल तपासला. त्यामध्ये टेम्पोचा फोटो दिसला. अधिक तपास केला असता, त्यातून रक्तचंदनाची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सहा कोटी रुपयांच्या ६ हजार ४२० किलो रक्तचंदन टेम्पोसह जप्त करत गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या फर्नांडिस आणि गिल यांनी जामिनासाठी ॲड. गणेश भूमकर यांच्यामार्फत अर्ज केला. दोघांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. टेम्पो आणि त्यातील माल जप्त करण्यात आला आहे. दोघांकडून काहीही जप्त करण्यात आलेले नसून, दोघेही कुटुंबातील कर्ते असल्याचे सांगत जामिनाची मागणी झाली. गुन्ह्याचा तपास संपल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निकाल दिला.
-----------------------------------------------------------