दोन्ही गटांतील वाद संयोजक मिटवणार
By admin | Published: December 9, 2015 12:25 AM2015-12-09T00:25:49+5:302015-12-09T00:25:49+5:30
अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि प्रकाशकांमध्ये निर्माण झालेले तणावाचे संबंध मिटविण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी पुढाकार घेतला आहे
पुणे : अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि प्रकाशकांमध्ये निर्माण झालेले तणावाचे संबंध मिटविण्यासाठी पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी पुढाकार घेतला आहे. संमेलनातील स्टॉलचे वितरण करण्यापूर्वी प्रकाशक परिषदेचे २ प्रतिनिधी संयोजनात घेऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. स्टॉल भाड्याचे दर कमी करण्यासंदर्भात दोन दिवसांत चर्चा होऊन निर्णय घेऊ, असेही सांगण्यात आले आहे.
साहित्य संमेलनाच्या स्टॉल उभारणीत मराठी प्रकाशक परिषदेचे २ प्रतिनिधी घेऊ, असे प्रकाशक परिषदेला दिलेले लेखी आश्वासन साहित्य महामंडळाने पाळलेले नाही. लेखी आश्वासनाची पूर्तताही महामंडळाने केली नसल्याने प्रकाशक-विके्रत्यांमध्ये नाराजीची भावना होती. महामंडळ प्रकाशकांना डावलले जात असल्याचे प्रकाशक परिषदेतर्फे सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, प्रकाशक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची आणि सदस्यांची तातडीची बैठक मंगळवारी सायंकाळी झाली.
याविषयी माहिती देताना अनिल कुलकर्णी म्हणाले, की प्रकाशक परिषद आणि विक्रेत्यांना महामंडळ का डावलत आहे, या मुद्द्याला धरूनच चर्चा झाली. महामंडळ पुण्यात आहे. महामंडळाचे पदाधिकारी पुण्यात आहेत, तरीही परिषदेकडे का दुर्लक्ष होत आहे, हे समजले नाही. महामंडळाने परिषदेला पत्र देऊनही त्याची माहिती संयोजकांना दिली नाही, ही बाब समोर आली आहे. बैठकीदरम्यान संयोजन समितीचे प्रतिनिधी सचिन इटकर आले असता त्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली. महामंडळाने नियम, अटी सांगितल्या; पण याची माहिती दिली नसल्याचे इटकर म्हणाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
स्टॉल भाड्यासंर्भातही मुद्दा उपस्थित करण्यात आला. छोट्या विक्रेत्यांना तसेच प्रकाशकांना ५ हजार रुपये परवडणार नाहीत; त्यामुळे भाडे तीन हजार रुपये करावे, अशी विनंती करण्यात आली असता डॉ. पी. डी. पाटील यांच्यासमवेत दोन दिवसांत बैठक घेऊन प्रश्न सोडवू, परिषदेने केलेल्या सर्व सूचनांचा विचार करू, असे आश्वासन इटकर यांनी दिल्याचे ते म्हणाले.
स्टॉल भाड्यातून मिळणारे उत्पन्न दुष्काळग्रस्तांना दिले जाणार याचा आम्हाला आनंद आहे; पण छोट्या विक्रेत्यांच्या दृष्टीने विचार व्हावा, अशी विनंती केली असल्याचे ते म्हणाले. बैठकीला अरुण जाखडे, सुनीताराजे पवार, संजय काकडे, अरविंद पाटकर, रमेश कुंदूर, अशोक सातपुते आदी उपस्थित होते.