Pune Metro: पुणेकरांच्या दोन्ही मेट्रो वर्षअखेरीस धावणार; भूयारातूनही प्रवास सुरु होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 07:59 PM2022-03-16T19:59:01+5:302022-03-16T19:59:12+5:30
वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांना प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्यामुळे महामेट्रोचे उत्साह दुणावला आहे
पुणे : भूयारातील काही स्थानके वगळता गरवारे महाविद्यालय ते रामवाडी तसेच फुगेवाडी ते शिवाजीनगर या दोन्ही मेट्रोमार्गांचे संपूर्ण काम वर्षअखेरीस पूर्ण करण्याचे आवाहन महामेट्रोने आता घेतले आहे. त्यातही गरवारे महाविद्यालय ते महापालिका व फुगेवाडीच्या पुढे आणखी ५ किलोमीटपर्यंतचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे.
मेट्रोच्या कामावर सध्या ८ हजार कामगार काम करत आहेत. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी ते फुगेवाडी या दोन्ही मार्गांना प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्यामुळे महामेट्रोचे उत्साह दुणावला आहे. त्यामुळेच आता मेट्रो मार्गाची पुढील कामे गतीने करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता टप्पे करून काम करण्याऐवजी संपूर्ण कामालाच प्राधान्य देत दोन्ही मार्ग पूर्ण करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे.
शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मार्ग पूर्ण भूयारी आहे. मंडईपासून पुढे कसबा पेठेपर्यंतचा एक भाग वगळता येणारा व जाणारा असे दोन्ही बोगदे आता पूर्ण झाले आहेत. बोगदा खोदला जात असतानाच त्याला क्राँक्रिटचे अस्तर तयार होत जाते. या ट्यूबमध्ये आता रूळ टाकण्याचे तसेच वि्द्यूत तारा, दिवे बसवण्याचे काम सुरू आहे. या ५ किलोमीटरच्या भूयारी मार्गात ५ स्थानके आहेत. त्यापैकी शिवाजीनगर स्थानकाचे काम गतीने होत आहे.
स्थानकात दोन्ही बोगदे एकत्र होतात व स्थानकाचे अंतर संपले की पुन्हा स्वतंत्र होतात. सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट या स्थानकांची कामे सुरू आहेत. भूयारी मार्गाचे कामही पूर्ण करून त्यातून वर्षअखेरीस मेट्रो सुरू करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे.
''कोरोना टाळेबंदीत मेट्रोच्या कामाचे काही महिने वाया गेले, मात्र तरीही पहिल्या दोन प्राधान्य मार्गांचे काम गतीने पूर्ण करण्यात आले व ते सुरूही झाले. आताही नियोजनबद्ध काम होत असून संपूर्णच काम संपवण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे असे हेमंत सोनवणे (संचालक, जनसंपर्क) यांनी सांगितले.''