ढेमेवस्तीत दोघांना घरात घुसून मारहाण
By admin | Published: March 15, 2016 04:00 AM2016-03-15T04:00:06+5:302016-03-15T04:00:06+5:30
दौंड-गोपाळवाडी रोड परिसरातील ढमेवस्ती येथे बंगल्यात राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल बारवकर (वय ६0), त्यांची पत्नी रेखा बारवकर (वय ५६) यांना त्यांच्या बंगल्यात
दौंड : दौंड-गोपाळवाडी रोड परिसरातील ढमेवस्ती येथे बंगल्यात राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल बारवकर (वय ६0), त्यांची पत्नी रेखा बारवकर (वय ५६) यांना त्यांच्या बंगल्यात घुसून चार व्यक्तींनी जबर मारहाण केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रेखा बारवकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी प्रतीक जाधव, विकी रणसिंग (दोघेही रा. दौंड) व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्या विरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार डी. जे. भाकरे यांनी दिली.
आम्ही पती-पत्नी न्यायालयात सुरूअसलेला खटला मिटवून
घेत नसल्याच्या कारणावरून गज व तीक्ष्ण हत्याराने आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे रेखा बारवकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी (दि.१४) पहाटेच्या सुमारास बारवकर यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
दरम्यान अनिल बारवकर यांच्या डोक्यात, हातावर तसेच त्यांच्या पत्नीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या वेळी दोघेही पती-पत्नी जोरजोरात ओरडून मदतीची याचना करत होते. हल्लेखोरांपैकी एकाने तातडीने बंगल्यातील बारवकर यांचा मुलगा आणि सून यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली.
दोघा पती- पत्नीवर वार झाल्यानंतर दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सजन हंकारे या घटनेचा तपास करीत आहेत. (वार्ताहर)