महावितरणच्या विश्रांतवाडी शाखेतील प्रधान तंत्रज्ञासह दोघांना लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:57+5:302021-09-04T04:15:57+5:30
पुणे : नवीन सदनिकांमधील तीन वीज मीटरची जोडणी करून एक मीटर ट्रान्सफर करण्यासाठी ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी ...
पुणे : नवीन सदनिकांमधील तीन वीज मीटरची जोडणी करून एक मीटर ट्रान्सफर करण्यासाठी ८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विश्रांतवाडी शाखेतील प्रधान तंत्रज्ञासह एकाला अटक केली आहे.
संदीप दशरथ भोसले (वय ३८, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण विश्रांतवाडी शाखा) आणि हरी लिंबराज सूर्यवंशी (वय २२ रा. लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका ५० वर्षीय तक्रारदाराने यासंबंधी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर येरवडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने नवीन सदनिकांचे बांधकाम केले आहे. त्यांच्या तीन फ्लॅटसाठी तीन वीज मीटर जोडणी करून एक मीटर ट्रान्सफर करण्यासाठी भोसले याने त्यांच्याकडे ८ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यासंबधी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची रक्कम सूर्यवंशी याने स्वीकारल्यावर दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी गुन्हा नोदविला.
------------------------------------