नीरेतील पालखी मार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’

By Admin | Published: October 3, 2015 01:00 AM2015-10-03T01:00:26+5:302015-10-03T01:00:26+5:30

पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील पालखी मार्गाची दुरवस्था झाली असून, याकडे सासवडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे.

The bottom line became the 'trap of death' | नीरेतील पालखी मार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’

नीरेतील पालखी मार्ग बनला ‘मृत्यूचा सापळा’

googlenewsNext

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरातील पालखी मार्गाची दुरवस्था झाली असून, याकडे सासवडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आहे. नीरा शहरातील पालखी मार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि पालखी मार्गावर काही ठिकाणी निर्माण करण्यात आलेले अनधिकृत कृत्रिम गतिरोधक आणि दगडाचे ढीग यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे.
वाहनधारक आणि नीरेतील नागरिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे संताप व्यक्त करीत आहेत.
नीरा शहरातील शिवाजी चौकापासून नीरा नदीपात्रावरील नवीन पुलांसह बीओटी तत्त्वावर काही वर्षांपूर्वी पालखी मार्गाचे रुंदीकरण करून सुधारणा करण्यात आली होती. नीरा शहरातील पालखी मार्ग आणि नगर मार्ग या दोन्ही मार्गाची सुधारणा करून त्याची देखभाल व दुरुस्ती तत्कालीन संबंधित ठेकेदारामार्फत केली जात होती. परंतु मध्यंतरी तत्कालीन आघाडी सरकारने एका आदेशाने नीरा नदी पैलतीरावरील बीओटी तत्त्वावरील टोलनाका बंद केला. परिणामी, नीरा शहरातील पालखी मार्ग आणि नगरमार्गाची दुरुस्ती अद्यापपर्यंत रखडली.
अशा स्थितीत संबंधित पाण्याच्या कनेक्शनमधूनदेखील गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गळती सातत्याने दररोज होत असल्याने या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. संबंधित पाण्याची गळतीची दुरुस्ती करण्यासाठी पालखी मार्गाची पुन्हा खोदाई करण्यात आली. गळतीच्या दुरुस्तीनंतर खोदाई केलेल्या जागी कृत्रिमरीत्या अनधिकृत गतिरोधक निर्माण करून पालखी मार्गावर गळतीच्या जागी मोठमोठे दगडाचे साम्राज्य रचण्यात आले. परिणामी या ठिकाणी पालखी मार्गावर गतिरोधक निर्माण झाल्याने छोटी मोठी वाहने आदळत असून रात्री - दिवसा या ठिकाणी रचलेल्या दगडांच्या ढीगामुळे किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. मात्र, या परिसरात निर्माण केलेला हा गतिरोधक वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. यासंदर्भात अनेक वेळा तक्रारी करूनदेखील सासवडच्या बांधकाम खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करून नीरा शहरातील पालखी मार्गाच्या दुरवस्थेसंबंधी दखल घेत नाहीत. बांधकाम खात्याने कृत्रिम गतिरोधक आणि दगडांचे ढीग काढून टाकून मार्गाची तत्काळ दुरुस्ती केली नाही, तर संतप्त ग्रामस्थ आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या स्थितीत आहेत.

Web Title: The bottom line became the 'trap of death'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.