फेअरवेल पार्टीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बाऊन्सरकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 14:05 IST2020-03-01T14:02:48+5:302020-03-01T14:05:55+5:30
हाॅटेलमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरकडून विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे.

फेअरवेल पार्टीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना बाऊन्सरकडून मारहाण
पुणे : महाबळेश्वर चौकातील एका हॉटेलमध्ये फेअरवेल पार्टीसाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बाऊन्सरने मारहाण केली. या मारहाणीत त्या दोन विद्यार्थ्यांची डोकी फोडण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हॉटेलमधील बाऊन्सर आणि त्यांच्या साथीदारांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार प्रतीक उत्तम कदम (वय २०, रा. गोखलेनगर) सिम्बायोसीस महाविद्यालयात वाणिज्य शाखेत द्वितीय वर्गात शिक्षण घेतो. त्याच्या महाविद्यालयाची गुरुवारी रात्री हॉटेलमध्ये फेअरवेल पार्टी होती. यासाठी तो मित्र स्वप्निल शिंगारे, स्वप्निल गव्हाणे, शुभम क्षीरसागर, राहुल होळकर, यश बनसोडे व विजय भुवड असे हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर महाविद्यालयातील जवळपास १०० ते १५० विद्यार्थी हजर होते. पार्टी दरम्यान ११.५० च्यादरम्यान हॉटेल व्यवस्थापनाने गाणी बंद केली. यामुळे फिर्यादी व त्याच्या मित्रांनी गाणी लावा, अशी विनंती केली. तेव्हा हॉटेल स्टाफ आणि मुलांमध्ये बाचाबाची झाली.
यानंतर फिर्यादी व त्याचे मित्र बाहेर पडले. तेव्हा समोरच्या लिफ्टमधून १० ते १२ बाऊन्सर आणि ओळखीचे रोहन निम्हण, योगेश मानकर, वरुण पाटील हजर होते. तेव्हा सर्वांनी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादीच्या दिशेनेही ४ ते ५ जण बाऊन्सर आले. त्यांनी व रोहन, वरुण आणि योगेश यांनीही त्यांच्यासह फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी व बांबूने मारहाण केली. त्यातील एकाने डोक्यात स्टीलचा रॉड टाकला. डोक्यातून रक्त आल्याने फिर्यादी व त्याचे मित्र तेथून बाहेर पडले. पार्किंगमध्ये आल्यावर फिर्यादीला त्याचा मित्र राहुल होडकर यालाही मारहाण करून डोक्यावर जखमी झाल्याने तो बेशुद्ध पडल्याचे दिसले. सुभाष क्षीरसागर याच्या डोक्यात, पाठीला व गुडघ्याला मारहाण झाली होती. स्वप्निल शिंगारे, स्वप्निल गव्हाणे व विनय भुवड यांनाही भांडणामध्ये जखमा झाल्या आहेत. या सगळयांवर रत्ना हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. यात राहुल होडकर याला रूग्णालयात हलवले.