साहित्य संंमेलनात प्रदर्शनाद्वारे ‘सीमाप्रश्न’ उलगडला जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:48+5:302021-02-08T04:10:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाच्या तीन हजार स्क्वेअर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाशिक येथील 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थळाच्या तीन हजार स्क्वेअर फूट जागेत महाराष्ट्राच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य चित्र प्रदर्शन भरविले जाणार आहे. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास, राज्याला यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत लाभलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचा लेखाजोखा अशा स्वरूपात ‘महाराष्ट्रा’चा उत्तुंग प्रवास उलगडला जाणार आहे. विशेष म्हणजे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून सीमा प्रश्नाचे घोंगडे भिजत पडले आहे. तो सीमा प्रश्न नेमका काय आहे? तो देखील प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठीजनांसमोर मांडला जाणार आहे.
दि.26 ते 28 मार्च दरम्यान कवी कुसुमाग्रजांच्या भूमीत 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘बिगुल’ वाजणार आहे. संमेलनाच्या नियोजनासाठी केवळ पावणे दोन महिनेच शिल्लक राहिले असल्याने आयोजकांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदाचे संमेलन आजवरच्या संमेलनापेक्षा उठावपूर्ण आणि ‘हटके’ कसे ठरेल यासाठी आयोजकांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. याकरिताच महाराष्ट्राला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. याकरिता शासनाच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडे आयोजकांनी संपर्क साधला असून, कार्यालयाला माहिती पाठविण्याची विनंती केली असल्याचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आजवर साहित्य संमेलनामध्ये बेळगाव सीमा प्रश्नासंबंधी अनेकदा ठराव मांडला गेला. पण सीमा प्रश्नासंबंधीची माहिती मराठीजनांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्य संमेलनाचा वापर केला जाण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.
--------------------------------
साहित्य संमेलनात ‘बालसाहित्य अन् कवी कट्टा’
यंदाच्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच लहान मुलांसाठी ‘कवी क ट्टा’ साकार केला जाणार आहे. त्यात मुलांना त्यांच्या स्वरचित कविता सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.या कट्ट्याबरोबरच बालसाहित्य मेळावा घेण्यात येणार असल्याचे जातेगावकर यांनी सांगितले.
----------------------------
संमेलनात दोन ठिकाणी ग्रंथप्रदर्शन
साहित्य संमेलन स्थळीच दोन ठिकाणी ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एका ठिकाणी 220 स्टॉल्स तर दुस-या ठिकाणी 180 स्टॉल्स असणार आहेत. तिथे एलसीडी टीव्हीची सुविधा देण्यात येणार आहे. दोन टप्प्यात ही प्रदर्शनाची विभागणी केली जाणार आहे.
--------------
नाशिकचा 151 वर्षांचा इतिहास ग्रंथस्वरूपात येणार
नाशिक जिल्हयाला 151 वर्षे झाली आहेत. त्याचा संपूर्ण इतिहास ग्रंथस्वरूपात जतन करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. यामाध्यमातून ‘खेळणारं’, ‘पेरणारं’, ‘लिहिणारं’, अशा विविध रूपातल्या नाशिक जिल्ह्याच्या योगदानाचे डॉक्यूमेंटेशन केले जाणार आहे. आगामी काळात कुणाला नाशिकवर पीएचडी करायची झाल्यास अभ्यासकांना त्याचा उपयोग होईल. संमेलनापर्यंत जरी त्याचे काम झाले नाही तरी संंमेलनात त्या ग्रंथाच्या मुखपृष्ठाचे अनावरण केले जाईल. वर्षभरात ग्रंथाचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली.
----------------------------------------------------------