प्रवेश समितीचे गुडघ्याला बाशिंग
By admin | Published: May 26, 2017 06:16 AM2017-05-26T06:16:16+5:302017-05-26T06:16:16+5:30
नियोजनाच्या अभावामुळे इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. माहितीपुस्तिकांच्या वाटपाच्या गोंधळामुळे अनेक शाळांना माहिती पुस्तिकाच उपलब्ध होवू शकल्या नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी/पुणे : नियोजनाच्या अभावामुळे इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. माहितीपुस्तिकांच्या वाटपाच्या गोंधळामुळे अनेक शाळांना माहिती पुस्तिकाच उपलब्ध होवू शकल्या नाहीत. तर आॅनलाईन प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अर्जाचा पहिला भागही भरता आला नाही. पुर्ण तयारी नसतानाही प्रक्रिया सुरू करण्याच्या घाईमुळे केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने ‘गुडघ्याला बाशिंग बांधल्याचा प्रत्यय गुरूवारी आला.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया समितीमार्फत राबविली जात आहे. शैक्षणिक वर्ष १९९६-९७ पासून केंद्रीय पध्दतीने ही प्रक्रिया राबविली जात आहे. तर २०१४-१५ पासून ही संपुर्ण प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आली. प्रवेश समितीने महिनाभरापुर्वीच मे महिन्याच्या अखेरीस प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होईल असे जाहीर केले होते. त्यानुसार गुरूवार (दि. २५) पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी संकेतस्थळ, माहिती पुस्तिकांची छपाई, वाटप या सर्व गोष्टींचे नियोजन झाले असून विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यापासून आॅनलाईन अर्जाचा पहिला भाग शाळेत किंवा मार्गदर्शन केंद्रांवर जावून भरता येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
मात्र, प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी समितीच्या नियोजनाचा गोंधळ समोर आला. समितीने माहिती पुस्तिका वाटप व इतर सोयी-सुविधांसाठी पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये नऊ झोन केले आहेत. त्यानुसार त्यांना शाळांचे नियोजन करून देण्यात आले आहे. बुधवारपासून या झोनच्या प्रमुख केंद्रांवर माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यास सुरूवात झाली. त्यानुसार काही शाळांनी या केंद्रांवरून बुधवारीच माहिती पुस्तिका नेल्या. गुरूवारी पहिल्या दिवशी सर्व केंद्रांवर पुस्तिका उपलब्ध होणे आवश्यक होते. परंतु, काही केंद्रांवर दुपारी चार वाजेपर्यंत पुस्तिकांचे वाटपच होवू शकले नाही. त्यामुळे या केंद्रांवर पुस्तिका नेण्यासाठी आलेल्या शाळांच्या प्रतिनिधींना हेलपाटा झाला. तसेच या शाळांमध्येही पुस्तिका नेण्यासाठी आलेल्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.
पिंपरी-चिंचवडमधील केंद्रांची आज पाहणी केली असता, कोणत्याही कें द्रावर मार्गदर्शन पुस्तिका उपलब्ध नाहीत. प्रवेश प्रक्रिया गुरुवारपासूनच सुरू झाली असल्याचे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने जाहीर केले आहे. त्यानुसार सर्व केंद्रांवर पालकांनी दहा वाजल्यापासूनच हजेरी लावण्यास सुरुवात केली. निगडी येथील प्रेरणा माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील मार्गदर्शन केंद्रावर तर सकाळी ११:४५ वाजेपर्यंत कोणीही माहिती देण्यासाठी उपस्थित नव्हते. त्यामुळे पालकांना खूप वेळ उभे राहावे लागले. शिवाय हे केंद्र इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील आहे. मात्र इतर बोर्डाचे विद्यार्थी आले की, त्यांना श्री म्हाळसाकांत विद्यालयात पाठवित होते. म्हाळसाकांत विद्यालयात विचारणा केल्यावर माहितीपुस्तिकाच आल्या नाहीत, असे सांगण्यात येत होते. भोसरीमधील केंद्रावर विचारणा केली असता चार-पाच दिवसांनी या, असेच सांगण्यात आले. त्यामुळे पालकांचा गोंधळ उडाला.
पिंपरी : अकरावी प्रवेशप्रक्रियेसाठी आवश्यक असणारी मार्गदर्शक पुस्तिकाच पिंपरी-चिंचवडमधील एकाही केंद्रावर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांसह पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय मार्गदर्शन केंद्रावरून व्यवस्थित मार्गदर्शनही मिळत नसल्याने होणाऱ्या गैरसोईत आणखीच भर पडत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांच्या सोईसाठी आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालय व निगडी येथील प्रेरणा विद्यालय, चिंचवड येथील श्रीमती ताराबाई मुथा हायस्कूल, संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटना, माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, पिंपरी येथील जयहिंद महाविद्यालय, नवमहाराष्ट्र विद्यालय, भोसरी येथील श्री भैरवनाथ विद्यालय, तसेच दापोडी येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या ठिकाणी मार्गदर्शन केंद्र आहेत.
संकेतस्थळ हँग : यंदा आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश समितीने नवीन कंपनीला नियुक्त केले आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले. आॅनलाईन तयारी पुर्ण झाल्याचे समितीकडून स्पष्ट करण्यात आले होते. दुपारी एक वाजल्यापासून अर्जाचा पहिला भाग भरता येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे प्रवेशाचे संकेतस्थळ हँग झाल्याने अर्ज भरताच आला नाही. विविध शाळांमध्ये शिक्षक व विद्यार्थी लिंक सुरू होण्याची वाट पाहत होते. पण दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज भरता न आल्याने त्यांची निराशा झाली.