बाऊल संगीत मनाेरंजनासाठी नव्हे : पार्वती बाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 06:27 PM2018-11-10T18:27:33+5:302018-11-10T18:28:43+5:30

बंगालमधील प्रसिद्ध लोकगीत गायिका, संगीततज्ञ आणि मौखिक कथावाचक म्हणून संगीतविश्वात प्रचलित असलेले एक नाव म्हणजे पार्वती बाऊल . हातात एकतारा, खांद्यावर डुग्गी आणि पायात घुंगरू बांधून होणारे रंगमंचीय सादरीकरण हे त्यांच्या कलाविष्काराचे अनोखे वैशिष्ट्य. ’बाउल संगीत’ ही बंगालच्या संस्कृतीची ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेच्या पाईक असलेल्या पार्वती बाऊल यांच्याशी ’लोकमत’ ने साधलेला संवाद.

Bowl music is not for entertainment: Parvati Bowl | बाऊल संगीत मनाेरंजनासाठी नव्हे : पार्वती बाऊल

बाऊल संगीत मनाेरंजनासाठी नव्हे : पार्वती बाऊल

googlenewsNext

नम्रता फडणीस

* बाऊल संगीताची परंपरा काय आहे? या संगीताची वैशिष्टये कोणती?
- बाऊल संगीत हे योगी संगीत आहे. ज्याला हजारो वर्षांची मौखिक परंपरा आहे. ही संगीत साधना गुरू शिष्य परंपरेतून आत्मसात करावी लागते. या संगीताचे शिक्षण घेण्यासाठी साधकाला दीक्षा घ्यावी लागते. ईश्वराचे नाव, योग आणि संगीतसाधना या नियमांबरोबर जीवन घालवावे लागते. ज्यांनी संगीताच्या खोलात जाऊन साधना केली त्यांच्याकडून  ध्यान आणि ज्ञानाच्या ग्रहणातून इतरांना चेतना मिळते. संगीतात नृत्य करताना एक भावोवस्था निर्माण होते आणि ईश्वरीय अनुभूती मिळते. शिव हे या  संगीताचे उगम स्थान आहे.


*  बाऊल संगीत आत्मसात करण्यासाठी कशाप्रकारची साधना केली जाते?
-  या संगीतात जे गायन केले जाते ती केवळ सुंदर कविता नाही. त्यामध्ये खोलवर एक अध्यात्मिक चिंतन दडलेले आहे...या संगीतात भक्तीचा मार्ग दाखविला आहे. साधनेशिवाय त्यातील भाव निर्माण करू शकत नाही. म्हणून या संगीतात साधना महत्वाची मानली गेली आहे. संगीत साधनेसाठी अनेक गुरूकुल आणि घराणी आहेत. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना केली जाते.

* एकाचवेळी गायन, वादन आणि नृत्य असा मिलाफ सादरीकरणामध्ये करणे तितकेसे सोपे नाही, तुम्ही हा समतोल सादरीकरणामध्ये कशापद्धतीने साधता?
- एकाचवेळी हातात एकतारा, खांद्यावर डुग्गी आणि पायात घुंगरू बांधून नाचणे हे कौशल्य आहे असे लोकांना वाटते. पण यामागे देखील अनेक वर्षांची साधना आहे. ते शिकावे लागते. बाउल संगीत हातात नाही ते भावाच्या परिपूर्णतेमध्ये आहे.

* बाऊल संगीत आणि महाराष्ट्रीय संगीतामध्ये काही फरक आढळतो  का?
- बाऊल संगीत आणि महाराष्ट्रीय संगीतामध्ये फक्त भाषेचा फरक आहे. ते सोडले तर दोन्ही संगीतपरंपरेमध्ये कमालीचे साम्य जाणवते. बाउल संगीतात ज्या वाद्यांचा वापर केला जातो तो थोडा वेगळा आहे. या संगीतात तुणतुणे, एकताराचा वापर केला जातो, आता गोपीयंत्राचा उपयोग केला जातो. अभिव्यक्ती वेगळी असली तरी भाव एकच आहे. संत तुकाराम, जनाबाई यांची पदावली आमच्या संगीताप्रमाणेच आहेत.

* आज तरूण पिढीसमोर पाश्चात्य, बॉलिवूड संगीताबरोबरच रिअँलिटी शोचेही आकर्षण आहे, या परिस्थितीमध्ये लोकसंगीताचे स्थान कुठे आहे असे वाटते?
- सध्याचे संगीत हे फास्टफूडसारखे झाले आहे. अनेक मुले टँलेंटेड आहेत. पण ज्या संगीताविषयी आपण चर्चा करीत आहोत ती एक जीवनचर्या आहे. याचे स्थान हजारो वर्षांपासून अढळ आहे. या संगीतासाठी समर्पण वृत्ती आवश्यक आहे. प्रसिद्धधी किंवा ग्लँमरसाठी हे संगीत नाही. जे साधनेच्या मार्गावर जाऊ इच्छितात त्यांना ते सहजरित्या आत्मसात होऊ शकते. हे संगीत ध्यानधारणेवर आधारित आहे. इतर संगीताची जी आकर्षण आहेत ती मनोरंजन प्रकारात मोडतात मात्र बाउल संगीत मनोरंजन नाही.

* युवा पिढीचा कल बाउल संगीत शिकण्याकडे आहे का? तुमचं निरीक्षण काय?
- ज्यांना साधना करण्याची इच्छा आहे अशी लहान  वयाची मुले-मुली आणि  तरूण पिढी बाऊल संगीताकडे वळत आहेत. या आशादायी  भविष्यात या संगीत परंपरेचे भवितव्य उज्वल आहे.

* विविध पातळीवरील लोकसंगीताचे डॉक्यूमेंटेशन होणे आवश्यक वाटते का?
- कोणत्याही संगीताचे साधनेच्या माध्यमातून जतन होऊ शकते. तेच खरे तर उत्तम माध्यम आहे. समाजात अनेक परिवर्तन झाली, युद्ध झाली तरी संगीताची परंपरा टिकून राहिली. हे साधनामुळे  शक्य झाले. पण संवर्धनाअभावी कालपरत्वे काही गोष्टी नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे नवी पिढीपर्यंत हा संगीत वारसा पोहोचण्यासाठी लिखित आणि ध्वनिमुद्रणाद्वारे त्याचे संवर्धन झाले पाहिजे. ज्यावेळी मी विद्यार्थी होते तेव्हा मला 140 वर्षांपूर्वी बाऊल संगीत कसे गायले जायचे, हे जाणून घेण्याची इच्छा होती.  पण ते लिखित स्वरूपात नसल्यामुळे  जाणून घेता आले नाही. स्वत:च्या भाषेत अभिव्यक्त होणे देखील आज दुर्मिळ झाले आहे. आपले संगीत आणि भाषेचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

Web Title: Bowl music is not for entertainment: Parvati Bowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.