अत्याचारांना पालिकाही जबाबदार
By admin | Published: August 24, 2016 01:09 AM2016-08-24T01:09:31+5:302016-08-24T01:09:31+5:30
वारजे माळवाडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारावरून नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मंगळवारी पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले.
पुणे : वारजे माळवाडी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारावरून नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत मंगळवारी पालिका प्रशासनाचे वाभाडे काढले. महिलांसाठीच्या स्वच्छतागृह, शौचालय बांधणी, सुरक्षेकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळेच असे प्रकार होत असल्याची टीका करण्यात आली. आयुक्तांनी आकडेवारी देत सावरून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त महिला सदस्यांचे समाधान झाले नाही.
माधुरी सहस्रबुद्धे यांनी हा विषय उपस्थित केला. वारजे माळवाडी येथील ती घटना त्या कुटुंबाकडे शौचालय नसल्यामुळेच झाली असल्याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मनीषा घाटे यांनी त्यावर पीएमपीच्या मुख्यालयातील महिला स्वच्छतागृहात काही जणांनी लावलेल्या कॅमेऱ्याचा विषय उपस्थित केला. शहरासाठी ही अत्यंत लाजीरवाणी घटना असून त्यातून प्रशासनाने काहीच बोध घेतला नसल्याची टीका त्यांनी केली. वर्षा तापकीर, नंदा लोणकर यांनी प्रशासनाला हा विषय गंभीर आहे असे वाटतच नसल्याचे मत व्यक्त केले.
या महिला सदस्यांच्या टीकेच्या भडीमारानंतर सर्वच सदस्य प्रशासनावर घसरले. कमल व्यवहारे यांनी शहराच्या मध्यभागात महिलांसाठी म्हणून स्वच्छतागृहांची काहीच व्यवस्था नाही असे सांगितले. सुनंदा गडाळे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. मीनल सरवदे स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता व सुरक्षा यावर बोलल्या. विद्येचे माहेरघर म्हणवणाऱ्या या शहरात महिलाच काय लहान मुलीही सुरक्षित नाहीत असे त्या म्हणाल्या. धनंजय जाधव, रवींद्र माळवदकर यांनी जुन्या पुण्यात महिलांच्या सुरक्षेचे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यात प्रामुख्याने त्यांच्या स्वच्छतागृहांची व्यवस्था हा विषय असून त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे असे ते म्हणाले.
चंचला कोद्रे, पुष्पा कनोजिया, वसंत मोरे, सचिन भगत, कर्णे गुरुजी, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. फक्त उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हणून शौचालये बांधण्यात येत आहेत. त्याचे ड्रेनेज, पाणी, सुरक्षा याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आयुक्तांपासून क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांपर्यंत कोणीही सुरक्षा उपाय राबविण्याचा साधा विचारही करीत नाहीत असे ते म्हणाले. सचिन दोडके यांनी या गंभीर विषयाबाबत प्रशासनाकडे काही धोरणच नसल्याची टीका केली. नागरिकांकडून मिळकत कर वसलू केला जातो, मात्र त्यांना नागरी सुविधा दिल्या जात नाहीत. अशा अनेक वसाहती उपनगरांमध्ये आहेत. तिथे त्वरित काही केले नाही तर यापुढेही अशा घटना होत राहतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
आयुक्त कुणाल कुमार यांनी आकडेवारी देत सदस्यांना आवर घालण्याच्या प्रयत्न केला, मात्र कोणीही त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उलट उद्दिष्टपूर्तीसाठी म्हणून ड्रेनेज किंवा अन्य व्यवस्था नसतानाही शौचालये बांधली गेली अशी टीका करण्यात आली. शहरात लवकरच मोबाईल शौचालये सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छतागृहे, शौचालये आवश्यक आहेत अशी गर्दीची १३० ठिकाणे शहरात निश्चित करण्यात आली असून, तिथे सार्वजनिक शौचालये बांधण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
>शौचालय बांधणीत पुणे महापालिकेचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. एका वर्षात पालिकेने १३ हजार ५०० वैयक्तिक शौचालये बांधली. शहरात कुठे त्याची गरज आहे याचा अभ्यास करूनच हे काम सुरू आहे. येत्या वर्षभरात आणखी ८ हजार शौचालये बांधण्यात येणार आहेत. जुन्या वाड्यांमध्ये घरमालक- भाडेकरू वाद असतात, त्यामुळे मर्यादा येतात, मात्र त्यावर मार्ग काढला जात आहे. सुरक्षा व स्वच्छता याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. वारजे-माळवाडी परिसरात त्वरित काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. यात काही अडचणी असतील तर त्या सोडविण्याचे प्रयत्न प्रशासन कसोशीने करीत आहे.
- कुणाल कुमार, आयुक्त