पुण्यातील जनता वसाहत येथील कॅनाॅलमध्ये मुलगा गेला वाहून
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 07:44 PM2020-02-21T19:44:22+5:302020-02-21T19:45:15+5:30
जनता वसाहत येथील कॅना्ॅलमध्ये पडून एक मुलगा वाहून गेल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून मुलाचा शाेध सुरु आहे.
पुणे : पुण्यातील कॅनाॅल शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दत्तवाडी जवळ एक चिमुकला नाल्यामध्ये वाहून गेल्याची घटना ताजी असतााच आता जनता वसाहत जवळील कॅनाॅलमध्ये एक 13 वर्षीय मुलगा पडल्याची घटना घडली आहे. सुरेश बागल (वय 13 ) असे त्या मुलाचे नाव आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 11 च्या सुमारास एक 13 वर्षीय मुलगा जनता वसाहत येथील एका कॅनाॅलमध्ये पडल्याची माहिती मिळाली. तत्काळ एरंडवणा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलगा पडला त्या भागात 3 किलाेमीटर पर्यंत शाेध घेतला. परंतु मुलगा मिळून आला नाही.या कँनॉलमध्ये सध्या खडकवासला धरणाचं पाणी सोडण्यात आलाय.त्यामुळे मुलगा वाहून दूर गेला असण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून पुन्हा मुलाचा शाेध घेण्यात येणार आहे.
दरम्यान या भागात नाल्यांना तसेच कॅनाॅलला कुठलिही सुरक्षा भिंत नसल्याने लहान मुले त्यात पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.