१० लाखांच्या खंडणीसाठी दोन वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 08:29 AM2019-03-28T08:29:00+5:302019-03-28T08:53:10+5:30
वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात दोन वर्षाच्या मुलगा खेळत असताना अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या मुख्य सुत्रधाराला जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
पुणे - वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात दोन वर्षाच्या मुलगा खेळत असताना अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांच्या मुख्य सुत्रधाराला जेरबंद करण्यात पुणेपोलिसांना यश आले आहे.
अपहरणाचा हा प्रकार २३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला होता. त्यानंतर पुढील ११ तासात पोलिसांनी पुष्कराज सोमनाथ धनवडे या दोन वर्षाच्या मुलाची सुटका केली होती. मात्र, यावेळी अपहरण करणारे पळून गेले होते. मुलाची यशस्वीपणे सुटका केल्यानंतर गेले चार दिवस गुन्हे शाखेची टीम या अपहरणकर्त्यांचा शोध घेत होती. गुरुवारी सकाळी तो मांजरी येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे छापा घालून त्याला ताब्यात घेतले आहे.
सध्या पोलीस त्याच्याकडे चौकशी करीत असून तो आपली वेगवेगळी नावे सांगत आहे. त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.
सोमनाथ धनवडे हे व्यावसायिक असून त्यांचा वडाची वाडी येथे बंगला आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता पुष्कराज हा बंगल्याच्या आवारात खेळत होता. तेव्हा त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर काही वेळाने सोमनाथ धनवडे यांना फोन करुन अपहरणकर्त्यांनी मुलाला सोडायचे असेल तर १० लाख रुपयांची खंडणी मागितली. धनवडे यांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिली.
२ वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण झाल्याचे समजताच कोंढवा पोलीस आणि गुन्हे शाखेची विविध पथके कामाला लागली. एक टीम नाशिकच्या दिशेने रवाना झाली. तांत्रिक विश्लेषणातून अपहरणकर्ते हे उंड्री परिसरात असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी असा ७० ते ८० जणांचा फौजफाटा रात्री उंड्रीमध्ये दाखल झाला. त्यांनी या परिसरातील एक एक जागा पिंजून काढण्यास सुरुवात केली.
पोलिसांच्या मदतीला काही ग्रामस्थही होते. हंडेवाडी परिसरात एका बाजूला पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांना मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. त्याबरोबर पोलिसांनी त्या भागात शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा एका बाजूला गोडावून आढळून आली. त्या ठिकाणी शोध घेण्याचा प्रयत्न करीत असताना ग्रामस्थांना एक जण मुलाला घेऊन पळून जात असल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने घाबरुन शेतात मुलाला सोडून तो पळून गेला.
पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन रविवारी सकाळी त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन पुष्कराजची सुटका करण्यात यश मिळविले.