वडिलांच्या आजारपणाला वैतागून मुलाने केला त्यांचा खून, मृतदेह तीन दिवस होता घरातच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 08:30 PM2021-06-10T20:30:00+5:302021-06-10T20:30:12+5:30
वडील गेल्या अनेक दिवसापासून आजारी असून जागेवरच झोपून होते, कोरोना चाचणी अहवालही आला निगेटिव्ह
उरुळी कांचन: वडिलांच्या आजारपणाला वैतागून मुलाने धारदार ब्लेडने मानेवर वार करत खून केल्याची घटना उरुळी कांचन येथे घडली आहे. मुलीच्या घरी राहणाऱ्या वडिलांचा मृतदेह तीन दिवस घरातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रहीम गुलाब शेख (वय ६७) असे मृत्यू झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर नईम रहीम शेख (वय ३८) असे आरोपी मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्यांची मुलगी शहेनाज रशीदखान जमादार ( वय ६७, रा. उरुळी कांचन) यांनी आज पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहीम गुलाब शेख हे पत्नीच्या निधनानंतर आपली मुलगी शहेनाज यांच्याबरोबर राहत होते. त्यांचा मुलगा नईमही आपल्या बहिणीकडेच राहत होता. नईमचे पत्नीसोबत भांडण झाल्याने तो एकटाच बहिणीकडे आला होता. तो किरकोळ स्वरुपात मोटरसायकल दुरुस्तीचा व्यवसाय करत असे. वडील गेल्या अनेक दिवसापासून आजारी असून जागेवरच झोपून होते. त्यांनी नुकतीच कोरोना चाचणी केली होती. आज त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
तपासणी अहवाल येण्याअगोदर केला खून
८ जूनला दुपारी मुलाचे व वडिलांचे किरकोळ भांडण झाले होते. अजूनही तपासणी अहवाल आला नव्हता. त्यापूर्वीच त्यांचा निर्घृण असा खून केला व तो मृतदेह १० तारखेपर्यंत घरांमध्ये दडपून ठेवला. बहिणीला याबाबत "कोणाला सांगितले तर, तुला मारून टाकेन" अशी धमकी दिली. घरातील इतर सदस्यांसह सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवले होते. मात्र मृतदेह सडून दुर्गंधी पसरल्याने बहिणीने पोलिसात धाव घेतली. नईम रहीम शेख याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. या गुन्ह्याचा तपास उरुळी कांचन पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराजे पवार हे करीत आहेत