आठ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

By admin | Published: January 10, 2017 02:39 AM2017-01-10T02:39:38+5:302017-01-10T02:39:38+5:30

स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली तरीही अद्याप भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य

The boycott of eight villages | आठ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

आठ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

Next

भोर : स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली तरीही अद्याप भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणी शिक्षण या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नाहीत. त्यामुळे भुतोंडे, गृहिणी, कुंबळे या ग्रामपंचायतींअंर्तगत असलेल्या ८ गावांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
याबबतचे निवेदन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रधान सचिव व पालमंत्र्यांना दिले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
छत्रपती शिवाजीमहाराजांची पहिली राजधानी असलेला राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी भोरपासून सुमारे ५५ किलोमीटरवर भाटघर धरणाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भुतोंडे, खुलशी-गृहिणी, चांदवणे, बोपे, कुंबळे, डेरे, खिळदेववाडी ही गावे आहेत. स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली तरीही अद्याप जिल्हा मार्गासह अंर्तगत पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे अनेक गावांत वाहन चालविणे अवघड होत आहे. त्यामुळे डोंगरदऱ्यांत वाहने जात नसल्याने नागरिकांना पायपीट करावी लागते.
प्राथमिक शाळा आहेत; मात्र तेथे मुलांना शिकविण्यासाठी पुरेशा प्रमाणात शिक्षकच नाहीत. या भागात शाळा मिळाली तर शिक्षक तेथे रुजूच होत नाहीत. कारण तेथे राहणे म्हणजे त्यांना मोठे संकट वाटते. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. याबाबत वारंवार मागणी करूनही शिक्षक उपलब्ध होत नाहीत. वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे दर पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होतो. तो चार महिने गायब असल्याने गावे अंधारातच राहतात. रात्रीअपरात्री घराबाहेर पडता येत नाही. मोबाईल टॉवर नसल्याने कोणत्याच मोबाईलला रेंज नसल्याने संर्पक होत नाही. काही काम असल्यास ५५ किलोमीटर दूर भोरला येण्याशिवाय कोणताच पर्याय राहत नाही.
येथील लोकांना उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नसल्याने रोजगार हमी योजनेचे काम करून चार रुपये मिळविले जातात. मात्र, मोबाईल रेंज नसल्याने पोस्टाचे आॅनलाईन काम बंद राहते. रोजगार हमीवर काम करणाऱ्या लोकांना पैसे मिळत नसल्याचे भुतोंडेचे सरपंच संतोष उफाळे व कैलास रेणुसे यांनी सांगितले.वरील विविध समस्यांबाबत संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदने देऊनही काहीच उपयोग होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. आठ गावांतील नागरिकांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी उपसभापती भगवान कंक यांनी सांगितले.

Web Title: The boycott of eight villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.