दिग्गज साहित्यिकांचा संमेलनावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 12:55 AM2019-01-08T00:55:28+5:302019-01-08T00:56:23+5:30

सोशल मीडियावर तीव्र नाराजी : नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून संताप

Boycott on the Legend of Legends on sahitya sammelan of yavatmal | दिग्गज साहित्यिकांचा संमेलनावर बहिष्कार

दिग्गज साहित्यिकांचा संमेलनावर बहिष्कार

Next

पुणे : ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला न येण्याचे पत्र आयोजकांकडून पाठवण्यात आल्याने नामुष्की ओढावली आहे. अनेक दिग्गज साहित्यिक, मान्यवरांनी सोशल मीडियावर आयोजकांच्या या भूमिकेवर आणि राजकीय दबावावर तीव्र शब्दांत खरमरीत टीका केली आहे. तसेच दिग्गज साहित्यिकांकडून संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभते का?’ इथपासून ‘सरकार अभिव्यक्तिस्वातंत्र्याची आणखी किती गळचेपी करणार’ असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात आले आहेत.

सेहगल यांच्या परखड भूमिकेचा आगामी निवडणुकांवर दूरगामी परिणाम होईल, या भीतीने राजकीय नेत्यांच्या दबावानंतर आयोजकांनी सहगल यांना सुरक्षेच्या कारणास्तव संमेलनाला न येण्याचे पत्र ई-मेलद्वारे पाठवले. त्यानंतर सर्व स्तरांतून या भूमिकेवर परखड टीका झाली. या झुंडशाहीच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज बुलंद करण्याचे मत सोशल मीडियातून नोंदवले जात आहे. दुसरीकडे, संमेलन सरकारमुक्त व्हावे, अशी मागणीही जोर धरत आहे. निमंत्रण पत्रिकेत असलेल्या प्रभा गणोरकर, विद्या बाळ, आशुतोष जावडेकर, नामदेव कोळी, बालाजी सुतार, राजीव खांडेकर, गणेश मोहिते, जयदेव डोळे, मंगेश नारायण काळे, श्रीकांत देशमुख, दिशा पिंकी शेख, रामचंद्र काळुंखे आदींनी बहिष्कार टाकला आहे. सर्वांनी बहिष्कार टाकावा आणि नाराजी नोंदवावी, अशी भूमिका साहित्यिकांनी घेतली आहे.

नयनतारा सहगल यांच्याबाबतीत काय घडते आहे, हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संमेलनाला जावे, असा सुरुवातीला विचार होता. मात्र, आता संमेलनात पाऊलही न टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र आयोजकांना पाठवणार असून, ते पत्र संमेलनात वाचले जावे, अशी सूचनाही करणार आहे. नयनतारा सहगल यांच्याबाबत घेतली गेलेली भूमिका अत्यंत अशोभनीय आहे. आयोजकांनी त्यांची माफी मागून दिलगिरी व्यक्त करावी.
- विद्या बाळ,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

कार्यक्रमावर बहिष्कार घालून निषेध नोंदविण्याची कृती चांगली आहे. मात्र, साहित्य संमेलनाचे विचारपीठ अथवा व्यासपीठ हे लेखक, वाचकांचे आहे. संमेलनस्थळी जाऊन निषेध नोंदवावा, असे मला वाटते. यवतमाळ व विदर्भातील साहित्यप्रेमींना नयनतारा सहगल यांच्या भाषणाच्या प्रती वाटाव्यात. नकार दिलेल्या आमंत्रितांनी सहभागी झाले तर आपल्या म्हणण्याला अधिक बळ येईल. अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पाठराखण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संमेलनस्थळी जाऊन निषेध नोंदवावा लागेल. - संदेश भंडारे

संमेलनस्थळी उपोषणातून कृती कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : यवतमाळ साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले आमंत्रण आयोजकांनी मागे घेतल्याने सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली आहे. याबाबत विविध माध्यमांतून मतमतांतरे व्यक्त होत असताना अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मुस्कटदाबीचा थेट सामना करण्यासाठी मानवी हक्क विश्लेषक अ‍ॅड. असीम सरोदे आणि राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे. राजकीय व्यवस्था, आयोजक, भूमिका न घेणारे साहित्यिक अशा घटकांचा निषेध नोंदविण्यासाठी संमेलनस्थळी एकदिवसीय उपोषण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. संमेलनावर बहिष्कार टाकण्याऐवजी तेथे जाऊन कृती कार्यक्रम करण्याचा त्यांचा मानस आहे. संमेलनाच्या मंडपात उपोषणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी साहित्य महामंडळाकडे केली आहे. एक दिवसाचे उपोषण आणि मौन सत्याग्रह असे या कृती कार्यक्रमाचे स्वरूप असेल.
अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले, ‘आयोजकांनी आमंत्रण मागे घेऊन मोठी चूक केली आहे. या चुकीचे प्रायश्चित्त घ्यावे, असे आयोजकांना वाटत नाही. दबाव निर्माण करून आपण मोठी चूक केली आहे, असे राजकीय नेत्यांनाही वाटत नाही. उद्घाटनाला कोणाला बोलवायचे, बोलवायचे की नाही, हा सर्वस्वी आयोजकांचा अधिकार आहे. म्हणूनच आम्ही दोघांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.’

राजकारणमुक्त साहित्य व्यवहार निर्माण व्हायचा असेल, तर त्याला पोषक परिस्थिती कधी निर्माण होणार? अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी आणि झुंडशाहीला आळा घालण्यासाठी आम्ही कृती कार्यक्रमाचा निर्णय घेतला आहे. याविरोधात पुढचे पाऊल काय असणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संयोजकांचा निषेध म्हणून आम्ही मंडपात आत्मक्लेश करणार आहोत. यातून कोणतीही चमकोगिरी करण्याचा हेतू नाही. प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या वेळी निषेधाची पत्रके वाटली जातील. यातून राजकीय पक्षांना आणि संयोजकांना धडा शिकवला जाणार आहे. साहित्यिकांना स्वत:च्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची जोपासना करता येत नसेल तर शारदेचा उत्सव केवळ नावापुरता राहील, हा संदेशही कृती कार्यक्रमातून दिला जाईल.
- विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Boycott on the Legend of Legends on sahitya sammelan of yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे