Swine Flu रुग्णांसाठी बीपी, डायबिटीस जीवघेणा; राज्यात आतापर्यंत ४९ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 09:56 AM2022-08-22T09:56:08+5:302022-08-22T09:59:18+5:30
सर्वाधिक मृत्यू ठाणे व पुण्यात
पुणे : स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये बीपी (उच्च रक्तदाब) व डायबिटीस (मधुमेह) हे दाेन्ही सहव्याधी मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. राज्यात १२ ऑगस्टपर्यंत ४९ मृत्यू झाले असून, त्यापैकी ७५ टक्के रुग्णांना म्हणजेच ३७ रुग्णांना बीपी व डायबिटीस या सहव्याधी हाेत्या. म्हणून या सहव्याधी असलेल्या रुग्णांना या आजाराचा धाेका अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
काेराेना कमी हाेत असला तरी आता राज्यात स्वाइन फ्लूने डाेके वर काढले आहे. त्यामुळे मृत्यूदेखील वाढत आहेत. परंतु, हे मृत्यू बीपी व डायबिटीसच्या रुग्णांमध्ये जास्त झालेले आहेत. ४९ रुग्णांपैकी १९ रुग्णांना उच्च रक्तदाब हाेता, तर १८ रुग्णांना मधुमेह हाेता, अशी माहिती राज्याच्या साथराेग विभागाने केलेल्या स्वाइन फ्लूच्या मृत्यूंच्या विश्लेषणात समाेर आली आहे.
पंधरा रुग्णांमध्ये नव्हती काेणतीही व्याधी
राज्यात ४९ रुग्णांपैकी १५ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला, परंतु त्यांच्यामध्ये काेणत्याही सहव्याधी किंवा काेणताही इतर आजार नव्हता. एकूण रुग्णांच्या तुलनेत ही टक्केवारी ३० इतकी आहे. याव्यतिरिक्त दाेन रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूबराेबरच ‘डायलेटेड कार्डिओमायाेपॅथी’ (हृदयाची रक्त पंपिंग करण्याची क्षमता कमी) तर आणखी दाेन रुग्णांमध्ये हायपाेथायराॅइडझम (शरीरात पुरेसे थायराॅइड हार्माेन्स तयार न हाेणे) ही समस्या हाेती. त्याचबराेबर २६ आठवड्याची गर्भवती, दमा, मेंदूज्वर, हृदयविकार, हायपाेटॅन्शन (प्रमाणापेक्षा कमी रक्तदाब), स्थूलता आणि ‘रॅबिट व्हायरल हिमाेरॅजिक डिसीज’(सशापासून हाेणारा संसर्गजन्य आजार) अशी सहव्याधी असलेले प्रत्येकी एक रुग्ण हाेते.
ठाणे, पुण्यात ४२ टक्के मृत्यू
राज्यात स्वाइन फ्लूने १२ ऑगस्टपर्यंत १३ जिल्ह्यांत ४९ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ठाण्यात १२ व पुण्यात ९ असे एकूण मृत्यूपैकी ४२ टक्के मृत्यू झाले आहेत. त्याशिवाय काेल्हापूर ७, नाशिक ५, नगर, नागपूर व सातारा प्रत्येकी ३ मृत्यू व उरलेल्या काही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मृत्यू नाेंदवला.