''कुलकर्णी चाैकातला देशपांडे'' चित्रपटाला ब्राह्मण महासंघाचा विराेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 01:33 PM2019-11-04T13:33:32+5:302019-11-04T13:37:31+5:30
कुलकर्णी चाैकातला देशपांडे या चित्रपटाच्या नावावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला असून नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे.
पुणे : प्रदर्शित हाेण्याच्या आधिच कुलकर्णी चाैकातला देशपांडे या चित्रपटाला आता विराेधाला सामाेरे जावे लागत आहे. एकाच जातीच्या आडनावावरुन चित्रपटाचे नाव ठेवून विशिष्ट समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न यातून केला असल्याचा आराेप करत ब्राह्मण महासंघाने या चित्रपटाला विराेध दर्शवला आहे.
गजेंद्र अहिरे यांचा कुलकर्णी चाैकातला देशपांडे या नावाचा मराठी चित्रपट 22 नाेव्हेंबरला प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, राजेश शिंगारपुरे, नीना कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा प्रदर्शित झाला आहे. विवाहबाह्य संबंध हा चित्रपटाचा विषय आहे. परंतु एकाच जातीच्या आडनावावरुन चित्रपटाचे नाव ठेवून केवळ विशिष्ठ समाजाला बदनाम करण्याचे धाेरण या दिसत असल्याचा आराेप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला आहे.
ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे म्हणाले, विवाहबाह्य संबंध आणि केवळ अनैतिक नाती हीच या चित्रपटाची कथा असल्याचे ट्रेलरवरून दिसत आहे. कथा निवडणे हा त्यांचा अधिकार आम्हाला मान्य आहे. परंतु एकाच जातीच्या आडनावावरून चित्रपटाचे नाव ठेवून केवळ विशिष्ट समाजाला बदनाम करण्याचे धोरण यात स्पष्ट दिसत आहे . एवढीच इच्छा असेल तर त्यांनी गजेंद्र च्या घरी आहिरे असे नाव ठेवावे. या चित्रपटाच्या नावाला आमचा विरोध असून ते त्यांनी बदलावे असा आमचा आग्रह आहे. तसाच आम्ही तो सेन्साॅर बोर्ड आणि पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना सुद्धा कळवणार आहोत. आमच्या ब्राह्मण महासंघ च्या वतीने या चित्रपटाला राज्यभर पूर्ण विरोध केला जाईल.