Video: 'ओ ताई बुके घ्या, तुझ्या बापाच्या...'; राष्ट्रवादी vs ब्राह्मण महासंघाचा पुण्यात 'राडा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 06:20 PM2022-04-21T18:20:23+5:302022-04-21T18:54:05+5:30
अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आंदोलन केले
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका भाषणाविरोधात ब्राह्मण महासंघाने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेर आज आंदोलन केले. ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे व त्यांचे सहकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महासंघाचे कार्यकर्ते आमनेसमने आल्याचे चित्र दिसून आले. राष्ट्रवादीची युवती आंदोलनकर्त्यांना बुके देताना ब्राह्मण महासंघाच्या महिलेने अपशब्द वापरल्याचे समोर आले आहे.
'ताई बुके घ्या ताई बुके घ्या' असं युवती म्हणत असताना महिलेने 'तुझ्या बापाच्या मढ्यावर घाल', असं रागात सांगितलं आहे. ब्राह्मण महासंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध करण्यात येत असून मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला असं सांगण्यात येत आहे. यावरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर ब्राह्मण महासंघाने जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राह्मण महासंघाच्या कार्यकर्त्यांत जोरदार झटापट झाल्याचं पाहायला मिळालं.
नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? आनंद दवेंचा सवाल
'अमोल मिटकरी हे मूर्ख असून ते ब्राह्मण समाजाविरोधात बोलले आहेत असे आम्ही म्हणतच नाही. पण त्यांनी हिंदु धर्मातील एक मंत्र चुकीच्या पद्धतीने वापरला यावर आम्ही आक्षेप घेतला आहे. मी माझी बायको पुरोहिताला देत आहे असं त्यांनी म्हटलं होत. हे चुकीचं आहे. नमाजविरोधात मिटकरी असं बोलतील का? असा सवाल दवे यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी हिंदु धर्माचं त्यांनी विडंबन केल्यामुळं आम्ही त्याचा निषेध आंदोलन केले आहे. असा कुठलाही मंत्र लग्नांमध्ये बोललाच जात नसल्याचेही ते यावेळी म्हणाले आहेत.'
काय म्हणाले होते अमोल मिटकरी
''आम्हा बहुजनाच्या पोरांना काही समजू देत नाही, एका लग्नात गेलो होतो तिथे नवरदेव पीएचडी आणि नवरी एमए झालेली होती. यावेळी ब्राह्मणाने एक मंत्र म्हटला ज्याचा अर्थ मी त्या नवरदेवाच्या कानात सांगितला की, महाराज म्हणताय माझी पत्नी घेऊन जा.''
मिटकरींचा खुलासा
मी तिथं एका गावातील कन्यादानाच्या प्रसंगाचं उदाहरण देऊन मंत्रोच्चाराचा उल्लेख केला. यामध्ये कोणालाही त्रास होण्याचं कारण नाही. त्यामुळं भाषणाचा विपर्यास करुन वेगळ्या पद्धतीनं वळण देण्याचं कटकारस्थानं केलं जात आहे. माझं भाषण जर पूर्ण ऐकलं असेल तर त्यामध्ये कुठल्याही समाजाचा उल्लेख केलेला नाही. मी कोणाबद्दलही अपशब्द बोललेलो नाही.