प्रदक्षिणेला एकटे गेल्याने लक्ष्मीदेवीला राग अनावर; लक्ष्मीनारायण यांच्यात फुलांची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 05:11 PM2018-02-06T17:11:03+5:302018-02-06T17:12:06+5:30
ब्रम्होत्सवाचा सोहळा आज (दि. ६) पुण्यातील कापडगंज येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात उत्साहात पार पडला. गेल्या ९० वर्षांपासून ही परंपरा या मंदिरामध्ये सुरू आहे.
श्रीकिशन काळे
पुणे : भगवान नारायण लक्ष्मीला सोडून सकाळी एकटेच प्रदक्षिणेसाठी गेले. त्यामुळे चिडलेल्या लक्ष्मीदेवीचा राग अनावर झाला आणि त्या रागाचा सामना भगवान नारायण यांना करावा लागला. लक्ष्मीदेवीने त्यांना घरातच घेत नाही. सात वेळा दरवाजा बंद करते. परंतु, भगवान नारायण शेवटी लक्ष्मीदेवींना प्रसन्न करतात आणि मग ब्रम्होत्सव साजरा केला जातो.
हा ब्रम्होत्सवाचा सोहळा आज (दि. ६) पुण्यातील कापडगंज येथील लक्ष्मी-नारायण मंदिरात उत्साहात पार पडला. गेल्या ९० वर्षांपासून ही परंपरा या मंदिरामध्ये सुरू आहे. मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त हा सोहळा साजरा केला जातो. त्याबाबत लक्ष्मी-नारायण यांच्या प्रेमाची अख्यायिकाही सांगितली जाते.
याबाबत सत्येंद्र राठी म्हणाले,‘‘गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. लक्ष्मी-नारायण दोघे दररोज सकाळी प्रदक्षिणेसाठी निघत असतात. परंतु, एके दिवशी भगवान नारायण एकटेच प्रदक्षिणेला जातात. त्यामुळे लक्ष्मीदेवी खूप चिडतात. त्यामुळे भगवान नारायण घरी परत आल्यानंतर त्यांना त्या घरातच घेत नाहीत. भगवान त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक वेळी वेगळी वेषभूषा करतात. सात वेळा ते दरवाजासमोर जातात. परंतु, सातही वेळा लक्ष्मीदेवी दरवाजा बंद करतात. त्यानंतर दोघांमध्ये फुले फेकून मारण्याची लढाई होते. शेवटी भगवान नारायण हे लक्ष्मीदेवींना प्रसन्न करतात आणि घरामध्ये घेतात. हा सोहळा या मंदिरात साजरा केला जातो. आज सकाळी हा पालखी सोहळा झाला. उद्या सकाळी लक्ष्मी-नारायण दोघे सोबत प्रदक्षिणेला निघातात, तेव्हा मोठी शोभायात्रा काढली जाते.’’