एमपीएससी करणाऱ्या अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतले पुस्तक फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:11 AM2021-03-20T04:11:13+5:302021-03-20T04:11:13+5:30
पुणे : दि ब्लाइंड वेल्फेअर संस्थेच्या वतीने एमपीएससीची तयारी करणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणारे ब्रेल लिपीतले पुस्तक तयार केले ...
पुणे : दि ब्लाइंड वेल्फेअर संस्थेच्या वतीने एमपीएससीची तयारी करणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणारे ब्रेल लिपीतले पुस्तक तयार केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, रोटरी क्लब टाऊनचे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, अधीक्षक अभियंता प्रशांत औटी, संचालक दिनेश मुसळे पाटिल, रेचल शिरसाठ वाल्मिक भडांगे, युवराज शाहा उपस्थित होते.
याप्रसंगी गोयल यांच्या हस्ते अंध विद्यार्थ्यांना १५०० रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
भारस्कर म्हणाले, शासनाचे कोणतेही अनुदान नसताना आम्ही दरवर्षी अंध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो. यंदा शिष्यवृत्तीसाठी १२४ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने ब्रेल लिपीतले पुस्तक तयार केले आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत प्रा. हेमंत देव आणि गौरी कापुरे यांनी लिहिलेले संगणक आणि माहिती तंत्रज्ञान हे पुस्तक ब्रेल लिपीत छापले आहे. विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या उच्च शिक्षणासाठी याचा फायदा होणार आहे. त्यामुळे अंधांसाठी रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.
पुस्तकात संगणकाची भूमिका, हार्डवेअर ओळख, संगणक वापर, डेटा कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग, इंटरनेट माहिती, नेटवर्क, मोबाईल कम्युनिकेशन, सायबर गुन्हे आणि त्यांचे प्रतिबंध असे विषय असणार आहेत.