आता ब्रेललिपीत अनुभवता येणार चित्रे: चिंतामण हसबनीस यांचा आगळावेगळा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 09:53 PM2018-06-22T21:53:09+5:302018-06-22T21:53:50+5:30
अंधमित्रांना दृष्टीआडची सौंदर्यपूर्ण सृष्टी कधी पाहता येतच नाही. परंतु, आता त्यांना चक्क चित्र पाहता येणार आहेत. कारण खास त्यांच्यासाठी ब्रेल लिपीमध्ये चित्रे तयार करण्यात आली असून, त्याची अनुभूती देण्याचे काम चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी केले आहे.
पुणे : अंधमित्रांना दृष्टीआडची सौंदर्यपूर्ण सृष्टी कधी पाहता येतच नाही. परंतु, आता त्यांना चक्क चित्र पाहता येणार आहेत. कारण खास त्यांच्यासाठी ब्रेल लिपीमध्ये चित्रे तयार करण्यात आली असून, त्याची अनुभूती देण्याचे काम चित्रकार चिंतामणी हसबनीस यांनी केले आहे. अंधांनाही चित्रे ‘दाखवणारा’ चित्रकार म्हणून एक अनोखी ओळख मिळवणारे चिंतामणी हसबनीस यांनी कधी दृक्-श्राव्य, तर कधी ब्रेल लिपीचे कोरीव काम करून चित्रे साकारली आहेत. ही कला जगभरातील अंधांपर्यंत पोहोचावी व अंधांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी हसबनीस यांच्या शालेय मित्रांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘दृष्टी-स्पर्श आर्ट फाउंडेशन’चे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते गुरूवारी झाले.
या वेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर आॅफ फिजिकली चॅलेंज्ड या संस्थेचे संस्थापक राहुल देशमुख, देवता अंदुरे देशमुख, फाउंडेशनचे संचालक हसबनीस व उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाल्या, ‘आज आपण अनेक गंभीर विषयांकडे सहज डोळेझाक केली आहे, डोळ्यांना पट्टीच बांधून बसलो आहोत, कानांत बोळे घातले आहेत आणि तोंडाला झिप लावून गप्प बसलो आहोत. आपल्याला माणूस म्हणून स्वत:ची ओळख झाली आहे की नाही, हे आज तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात भवतालात जी परिस्थिती पाहायला मिळते, हे पाहता आपण खरंच डोळस आहोत का, असा प्रश्न मला पडतो. अशावेळी ज्यांना निसर्गत: काही मयार्दा आहेत, अशांसाठी कुणीतरी मदतीचा हात घेऊन पुढे येत असेल तर, त्यासारखी मोठी गोष्ट नाही.’देशमुख म्हणाले, ‘कुठलेतरी वेड घेऊन त्या ध्येयाच्या पाठी धावल्या शिवाय असामान्य कामगिरी कधीही होऊच शकत नाही. ही सुंदर सृष्टी, तिची विविध रूपे ज्यांनी कधीच पाहिली नाहीत, अशा अंधांसाठी एखादे काम करणे हे खरोखर महत्त्वाचे म्हणायला हवे. येत्या काळात अंध व्यक्तींच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदाव्यात म्हणून नुसती ब्रेल लिपीत असणारी रुक्ष पुस्तके जर चित्र रूपाने विकसित होऊ हाकली, तर ते खूप मोलाचे ठरेल.’