ब्रेनडेड झालेल्या १४ वर्षीय मुलाचे केले अवयवदान; शाहूनगर येथील दाम्पत्याचा आदर्शवत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 10:31 AM2023-09-04T10:31:00+5:302023-09-04T10:35:50+5:30

पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याने खचलेल्या आई- वडिलांनी दु:ख बाजूला सारत त्याचे अवयव दान केले. त्यामुळे सात जणांवर अवयव प्रत्यारोपण करण्यात आले...

Brain-dead 14-year-old boy donates organs; Ideal decision of a couple from Shahunagar | ब्रेनडेड झालेल्या १४ वर्षीय मुलाचे केले अवयवदान; शाहूनगर येथील दाम्पत्याचा आदर्शवत निर्णय

ब्रेनडेड झालेल्या १४ वर्षीय मुलाचे केले अवयवदान; शाहूनगर येथील दाम्पत्याचा आदर्शवत निर्णय

googlenewsNext

- नारायण बडगुजर

पिंपरी : दोन मित्र एका दुचाकीवरून जात असताना अपघात घडला. यात दुचाकीचालक मित्राचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले. सात दिवस उपचारांची शर्थ झाली. मात्र, मेंदू निकामी (ब्रेन डेड) होऊन त्याचा मृत्यू झाला. पोटच्या मुलाचा मृत्यू झाल्याने खचलेल्या आई- वडिलांनी दु:ख बाजूला सारत त्याचे अवयव दान केले. त्यामुळे सात जणांवर अवयव प्रत्यारोपण करण्यात आले.

अक्षत सचिन लोहाडे (१४), असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. अक्षत याचे वडील सचिन लोहाडे हे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत, तर आई सुवर्णा ही विमा प्रतिनिधी आहे. मोठी बहीण विधी हिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. अक्षत हा इयत्ता नववीत शिकत होता. मूळचे औरंगाबाद येथील असलेले सचिन लोहाडे काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आले. कुटुंबासह ते शाहूनगर येथे वास्तव्यास आहेत. मुलगा अक्षत याला चांगले शिक्षण देण्यासाठी त्यांची धडपड होती.

अक्षत हा २५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याच्या एका मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. त्यावेळी दुचाकीला अपघात घडला. दुचाकी चालवत असलेल्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. अक्षत गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मेंदू निकामी झाला. काहीही करा; पण आमच्या अक्षतला बरे करा, अशी आर्त विनवणी आई सुवर्णा यांनी डाॅक्टरांनी केली. मात्र, उपचारांना प्रतिसाद मिळत नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अक्षतचे अवयवदान केल्यास समाजाला मोठा संदेश देता येईल. काही जणांचे आयुष्य बचावू शकते, तसेच काही जणांना अपंगत्वावर मात करता येईल, असे सांगत मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. अमित पांडे यांनी समुपदेशन केले. त्यानंतर अक्षतचे अवयव दान करण्याचा आई- वडिलांनी निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी सकाळी अवयवदान करण्यात आले.

‘आता कोणाला राखी बांधायची?’

अक्षत हा रुग्णालयात ‘ब्रेनडेड’ अवस्थेत असताना बहीण विधी हिने त्याला राखी बांधली. लाडक्या असलेल्या लहान भावाला दरवर्षी मोठ्या आनंदात राखी बांधत होती. मात्र, यंदा रक्षाबंधनला मोठे दु:ख ओढावले. यापुढे कोणाला राखी बांधायची, असे म्हणत बहीण विधी हिने दु:ख व्यक्त केले.

अवयवदान करून लोहाडे कुटुंबीयांनी समाजाला संदेश दिला आहे. दु:ख बाजूला सारून इतरांच्या आयुष्याचा विचार केला आहे.

-जितेंद्र छाबडा, संभाजीनगर, चिंचवड (सुवर्णा लोहाडे यांचे मामा)

Web Title: Brain-dead 14-year-old boy donates organs; Ideal decision of a couple from Shahunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.