Breaking : पुण्यात आणखी एकजण कोरोनाबाधित ; परदेशी पार्श्वभूमी नसल्याने चिंतेचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 11:12 PM2020-03-26T23:12:10+5:302020-03-26T23:16:23+5:30
पुण्यात आणखी एक काेराेनाबाधित रुग्ण आढळला असून ताे कुठल्याही परदेशी प्रवाशाच्या संपर्कात न आल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
पुणे : कोरोनाची लागण झालेले पाच रुग्ण दोन दिवसात घरी परतले असले तरी नवीन रुग्णांची भरही पडत आहे. गुरुवारी आणखी एकाला कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ठ झाले. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा एकूण आकडा २० वर पोहचला आहे.
महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या पहिल्या दोन रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले. तर गुरुवारी कोरोना मुक्त आणखी तीन जण सुखरूपणे घरी गेले. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. पण गुरुवारी एका संशयित रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ठ झाल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे 40 वर्ष वय असलेल्या या रुग्णाला परदेश प्रवासाची पार्श्वभूमी नाही. तसेच तो परदेश प्रवास केलेल्या कोणाच्या संपर्कात आला होता की नाही याचा शोध घेतला जात आहे. यकृताचा त्रास असल्याने त्याला २० मार्च ला डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातच कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांच्या घशातील स्त्रावाचा नमुना राष्ट्रीय विषाणू संस्थेत तपासणीसाठी पाठविला होता. त्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना बधितांचा आकडा २० वर पोहचला आहे. पिंपरी चिंचवड मधील बधितांचा आकडा १२ वर स्थिर आहे.