पर्यावरणसंवर्धनासाठी ‘ब्राऊनलिफ’ चळवळ, नव्या वर्षाचा नवा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:25 AM2018-01-01T05:25:39+5:302018-01-01T05:25:50+5:30
झाडाचे पान गळून पडले की, त्याचा काही उपयोग नसतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. परंतु हे गळालेले पानदेखील खूप मोलाचे आहे. ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरू शकते. पानगळती झाली, की अनेक ठिकाणी कचरा समजून त्याला जाळण्यात येते.
- श्रीकिशन काळे
पुणे : झाडाचे पान गळून पडले की, त्याचा काही उपयोग नसतो, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. परंतु हे गळालेले पानदेखील खूप मोलाचे आहे. ते पर्यावरणासाठी उपयुक्त ठरू शकते. पानगळती झाली, की अनेक ठिकाणी कचरा समजून त्याला जाळण्यात येते. परंतु, जाळल्यानंतर उलट त्याचा धूर आरोग्यास धोकादायक ठरतो. ही पाने कोणीही जाळू नये, तर त्याचे जतन करावे. हाच नवीन वर्षाचा संकल्प ‘ब्राऊनलिफ’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या चळवळीत नागरिकांनीही सहभागी होऊन पर्यावरण जपण्याचा ध्यास घेतला पाहिजे. ही चळवळ पर्यावरणासाठी नक्कीच लाभदायक ठरणारी आहे. दरवर्षी सुमारे नोव्हेंबर ते मार्च महिन्यात पानगळती होत असते. त्यामुळे परिसरात प्रचंड ‘ब्राऊनलिफ’ पडलेले असतात. हा कचरा समजून सफाई कर्मचारी एकत्र करून ते जाळून टाकतात. त्यामुळे पर्यावरणाचीच हानी होत असल्याचे त्यांच्या लक्षात येत नाही. ही गळती झालेली पानेदेखील निसर्गासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे ती जाळू नयेत, यासाठी पर्यावरणप्रेमी अदिती देवधर यांनी ‘ब्राऊनलिफ’ ही चळवळ सुरू केली आहे.
दोन वर्षांपूर्वी त्यांनी ही संस्था सुरू केली. त्याद्वारे ‘ब्राऊनलिफ’साठी कार्य सुरू केले. या ‘ब्राऊनलिफ’ संकेतस्थळावर त्यांनी या चळवळीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. देशात एकही ‘ब्राऊन’ पान जाळले जाऊ नये, हा त्यांचा संकल्प आहे. त्यासाठी त्यांनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी या चळवळीसाठी कार्य करणाºयांचा समावेश केला आहे. प्रत्येक जण आपापल्या भागात याबाबत जनजागृती करीत आहेत.
झाडावरून गळून पडलेल्या पानांमध्ये ५० ते ७० टक्के पोषक द्रव्य असते. ते जमिनीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. या पानांमुळे मातीमधील ओलावा टिकून ठेवला जातो. या पानांमुळे बाष्पीकरण कमी होते. त्यामुळे ही पाने झाडांच्याभोवती टाकली पाहिजेत.
पाने जाळणे धोकादायक
कोरडी पाने जाळण्यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कारण हा वायूप्रदूषणाचा एक भाग आहे. त्यामुळे पर्यावरण व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. या धुरामध्ये अनेक विषारी कण आणि वायू तयार होत असतात. परिणामी अशी पाने जाऊ नये, यासाठी ही ‘ब्राऊनलिफ’ची चळवळ सुरू करण्यात आली आहे. कोरडे पाने जाळल्यानंतर खोकला, छातीत दुखणे, धाप लागणे, दीर्घकालीन श्वसनाची समस्या निर्माण होणे आदी त्रास नागरिकांना होऊ शकतो. दमा किंवा इतर श्वसनाच्या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी तर ही पाने जाळणे अत्यंत धोकादायक आहे.
या पानांचे करायचे काय?
सध्या दररोज पानगळती झाल्यानंतर जमिनीवर कोरडी पाने पडलेली असतात. या पानांचे करायचे काय ? असा प्रश्न अनेकांना पडतो, तर त्यावर ‘ब्राऊन लिफ’ने तीन उपाय सुचविले आहेत.
पहिला :
तुमच्या सोसायटीमध्ये किंवा एखाद्या मोकळ्या जागी ही पाने एकत्र करून ठेवा.
दुसरा : पाने एकत्र करून त्यापासून कंपोस्ट तयार करता येते.
तिसरा : ‘ब्राऊनलिफ’ ही संस्था एकत्र केलेली पाने ज्यांना गरज आहे, त्यांना देते. त्यामुळे सोसायटीधारकांनी ही पाने एकत्र करून संस्थेला दान करावीत.