शाब्बास पुणे पोलीस ! टिवटिव करणाऱ्यांना दिले असे उत्तर की वाचून अभिमान वाटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 20:19 IST2019-12-31T20:09:47+5:302019-12-31T20:19:08+5:30
अतिशय विचारपूर्वक दिलेली ही उत्तरं वाचून हसू आवरत नाही. मात्र अंतिमतः कायदा आणि सुव्यवस्था सर्वोच्च आहे हेदेखील जाणवते. नर्मविनोदी आणि तरीही खमक्या भाषेत दिलेले हे ट्विटर युद्ध आवर्जून वाचावे असे आहे.

शाब्बास पुणे पोलीस ! टिवटिव करणाऱ्यांना दिले असे उत्तर की वाचून अभिमान वाटेल
पुणे :ट्विटरवरून हल्ली कोण काय टिवटिव करेल हे सांगता येत नाही. ट्विटरवर एकमेकांना आव्हान देणे, अपशब्द वापरणे, ट्रोल करणे नवीन नाही. पण पुणे पोलिसांनी टिवटिव करणाऱ्या यूजर्सना थेट शालजोडीत उत्तर दिले आहे. अतिशय विचारपूर्वक दिलेली ही उत्तरं वाचून हसू आवरत नाही. मात्र अंतिमतः कायदा आणि सुव्यवस्था सर्वोच्च आहे हेदेखील जाणवते. नर्मविनोदी आणि तरीही खमक्या भाषेत दिलेले हे ट्विटर युद्ध आवर्जून वाचावे असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ म्हणजे चरस, गांजा यांना २०२०साली निरोप देऊ असे ट्विट केले. त्यावर एका युजरने दारूवर बंदी नाही ना असा प्रश्न केला. त्यावर हार न मानता पुणे पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालवण्यावर बंदी आहे असे पुणेरी उत्तर दिले.
त्याच ट्विटला एका युजरने उत्तर देताना. 'मित्रांनो एलएसडी'ला परवानगी आहे' असे ट्विट केले. त्यावर पोलिसांनी ते कुठे मिळेल असे विचारले. त्यावर एका अतिहुशार युजरने मी तुम्हाला अड्डा सांगितलं तर १० पुड्या मला देणार का असा प्रश्न विचारला. पोलिसांनी यावर चाणाक्ष उत्तर देताना तुम्ही सगळ्या पुड्या ठेवून घ्या, आम्ही तुम्हाला ठेवून घेऊ असे उत्तर त्याला गप्प केले.
अजून एका युजरने कितना पारिवारिक माहोल है असा टोमणाही मारला पण त्यावरही पोलिसांनी 'ये शहर हमारा परिवार ही तो है सर' असं सणसणीत उत्तर दिलं.या सर्व संभाषणाचे स्क्रीन शॉट्स व्हायरल झाले असून अनेकांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले आहे.