चारित्र्याच्या संशयावरुन ब्राझिलियन पत्नीचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:04 PM2018-06-30T17:04:42+5:302018-06-30T17:05:14+5:30
चारित्र्यांच्या संशयावरून पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ करणा-या पतीला न्यायालयाने फटकारले आहे.
पुणे : वंशाला दिवा हवा आणि चारित्र्यांच्या संशयावरून ब्राझिलियन पत्नीचा मानसिक व शारिरीक छळ करणा-या पतीला न्यायालयाने फटकारले आहे. पत्नी राहत असलेल्या घरात जायचे नाही. पत्नी व मुलांचा कोणत्याही प्रकारे छळ करायचा नाही, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. देशपांडे यांच्या न्यायालयाने दिला आहे. मियामा आणि विल्सन (नावे बदलेली) असे या पती-पत्नीचे नाव आहे. मियामा ही मुळची ब्राझीलची असून तिने भारतीय नागरिक असलेल्या विल्सन बरोबर १९९९ साली प्रेम विवाह केला.
मियामा ही शहरातील एका मोठ्या आयटी कंपनीत कामाला असून विल्सन हा एक एनजीओ चालवतो. पहिली मुलगी झाल्यानंतर वंशाला दिवा म्हणून आपल्याला मुलगाच हवा, अशी मागणी विल्सन वारंवार करत होता. तसेच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तो तिला मानसिक व शारीरिक त्रासही देवू लागला. दरम्यान, तक्रारदार पत्नीला तीन मुली झाल्या. त्यामुळे त्याच्याकडून होणा-या छळात वाढ होत गेली. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने न्यायालयाधात धाव घेतली. पीडितेने अॅड. अभिजीत निमकर आणि अक्षत कुमार यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यावर झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत, अशी माहिती अॅड. निमकर यांनी दिली. या प्रकरणात ब्राझील दूतावासाने सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, मियामा यांना त्या काम करीत असलेल्या कंपनीने हंगेरी येथील कार्यालयात व्यवस्थापक पदाची आॅफर दिली आहे. त्यामुळे तिने मुलींसह हंगेरीला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी विल्सन याने हरकत नसल्याचे पत्र दिले होते. मात्र, आता त्याने मुलींचा ताबा मिळावा म्हणून अर्ज केला आहे. पण विल्सन यांच्यावर बालकांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे मुलींना त्याकडे ठेवणे धोकादायक असल्याचे अॅड. निमकर यांनी न्यायालयाच्या निर्दशनात आणून दिले.