तुकोबांच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळेंनी फिरवली भाकरी; यवत मुक्कामी पिठलं-भाकरीचा बेत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 04:34 PM2023-06-15T16:34:34+5:302023-06-15T16:35:09+5:30
अस्सल ग्रामीण चवीचा तडका असलेले खमंग पिठलं वारकऱ्यांच्या विशेष पसंतीचे
यवत : अनेक वर्षांच्या परंपरेप्रमाणे यंदाही यवतकरांनी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी एक टनाचे पिठलं आणि लाखभर भाकरी याची मेजवानी दिली. वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरी बनवण्यची परंपरा यवतकरांनी जपली आहे. आज सकाळ पासून गावातील ग्रामस्थांची पालखी मुक्काम असलेल्या श्री काळ भैरवनाथ मंदिरात पिठले बनविण्यासाठी जोरदार तयारी सुरू होती. गावातील सर्वधर्मीय ग्रामस्थ एकत्र येवून पिठले भाकरीची मेजवानी देत असतात. घरोघरी भाकरी बनवून मंदिरात एकत्र केल्या जातात. साडेतीनशे किलो बाजरीच्या पिठाच्या भाकरी मंदिराच्या भटारखान्यात महिलां करवी बनविण्यात आल्या. त्याठिकाणी खासदार सुप्रिया सुळेंनी स्वतः भाकरी बनविण्याचा अनुभव घेतला.
यवत येथे ग्रामीण भागातील तसा पहिलाच मुक्कमा असतो. या दिवशी वारीतील सुमारे एक लाख वारकऱ्यांना पुरेल इतके जेवण बनवण्याची यवतकरांची परंपरा आहे. अस्सल ग्रामीण चवीचा तडका असलेले खमंग पिठलं वारकऱ्यांच्या विशेष पसंतीचे बनले आहे. एका कढईत वीस किलो बेसण पिठ व चाळीस किलो इतर साहित्य असे मिळून साठ किलो पिठलं बनते. अशा सुमारे चौदा ते पंधरा कढयांमध्ये हे पिठले बनवले जाते. गावातील तरूण मंडळी मेहनत घेतात तर जेष्ठ मार्गदर्शन करतात. सायंकाळी अनेक कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवण वाढण्याचे काम केले जाते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी फिरवली भाकरी
एकीकडे राजकिय पटलावर भाकरी फिरविण्याची चर्चा राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यावर पक्षाच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाली. आज यवत येथे पालखी मुक्काम ठिकाणी ग्रामस्थांची पिठलं भाकरी बनविण्याची लगबग सुरू असताना खासदार सुळे यांनी भेट दिली. त्यांनी पिठले भाकरी बनविण्यासाठी असलेल्या परंपरेची माहिती घेत मदतही केली. भटारखान्यात महिला भाकरी बनवित असताना तेथे स्वतः भाकरी बनविण्याचा अनुभव घेतला.