Break the chain: नव्या नियमांचा उद्योगांना फटका. केवळ ३०% उद्योग राहणार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:14 PM2021-04-15T20:14:26+5:302021-04-15T20:15:14+5:30
बंधनांमुळे व्यवसाय विस्कळीत. अनेक कामगार गेले काम सोडून परत
जीवनावश्यक उत्पादने आणि निर्यातक्षम उत्पादने घेणाऱ्या कंपन्यांना परवानगी देण्याच्या निर्णयाचा फटका उद्योगांना बसणार आहे. या नियमांमुळे उद्योग नगरीतील तीस टक्के कंपन्या सुरू होऊ शकतील. त्याही पूर्ण क्षमतेने काम सुरू होऊ शकणार नसल्याचे मत उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी व्यक्त केले.टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कंपन्यांनी कमी लोकांच्या उपस्थितीत काम सुरु केले आहे तर इतर अनेक कंपन्यांनी काम पुर्णपणे बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी एप्रिल महिना अखेरीपर्यंत राज्यात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. औषधे, जीवनावश्यक वस्तू, कृषी, कृषी प्रक्रिया उद्योग, डेअरी, फोर्जिंग उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच शहरातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंची उत्पादन साखळी अबाधित राहणार आहे. या निर्णयामुळे उद्योग नगरीतील बड्या कंपन्या पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाहीत. परिणामी त्यावर अवलंबून असणाऱ्या कंपन्या देखील पूर्ण क्षमतेने सुरू राहणार नाहीत. तसेच अनेक लघू उद्योग परदेशातील आणि स्थानिक मागणीवर अवलंबून आहेत. निर्यातीच्या कामाशी त्यांचा फारसा संबंध येत नाही. असे ७० ते ७५ टक्के सुक्ष्म आणि लघू उद्योग सुरूच होऊ शकणार नाहीत. उद्योग नगरीत अकरा हजार सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग आहेत. या सर्व उद्योगांची घडी पुन्हा विस्कळीत होणार आहे. ------ निर्यात आणि जीवनावश्यक वस्तूंशी संबंधित उद्योग सुरू राहणार आहेत. त्यामुळे शहरातील ७० टक्के उद्योग सुरू होऊ शकणार नाहीत. ऑटोमोबाईल संबंधीत अनेक वस्तू शहरातून परराज्यात पाठविल्या जातात. त्यांना वेळेत माल न मिळाल्यास कंपन्यांच्या हातातील काम जाण्याची शक्यता आहे. याचा विचार झाला पाहिजे. उद्योगांना सरसकट परवानगी द्यायला हवी होती. त्याच बरोबर उद्योगांना लोखंड, स्टेनलेस स्टील, सुट्टे पार्ट, बेअरिंग अशा गोष्टींची आवश्यकता असते. या वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने किमान चार तास सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाने कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. याविषयी बोलताना मराठा चेंबर ॲाफ कॅामर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे प्रशांत गिरबने म्हणाले “ आज आम्ही जेव्हा आढावा घेतला तेव्हा बहुतांश कंपन्यांनी फक्त निर्यातीशी निगडीत कामकाज सुरु ठेवले आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली आहे. अगदी काही तुरळक अपवाद वगळता कोणाला कंपनीत जायला त्रास मात्र झाला नाही” संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड लघू उद्योजक संघटना म्हणाले “ वस्तू आणि निर्यात करणारे उद्योग सुरू राहणार आहेत. त्यामुळे काही बड्या कंपन्यानी आपली कामे कमी केली आहेत. त्यामुळे अनेक लघू उद्योगांना एका शिफ्टमध्ये काम करावे लागेल. उद्योगांचे कामकाज विस्कळीत होणार आहे. “ अभय भोर , फोरम फॅार स्मॅाल स्केल इंडस्ट्रीज असोसियेशन यांच्या मते “ सध्या ७०% कंपन्या बंदच आहेत. अनेकांना नुकसान सोसावं लागत आहे. मुळात कर्ज काढुन लोकांनी कामकाज सुरु केले होते. पण निर्यात होणं अपेक्षित असलेला माल पाठवला गेला नाही. त्यानंतर सप्लाय चेन विस्कळीत झाली आहे. त्यातच नव्या नियमावलीनुसार लोकांना ने आण करणे किंवा रहायची सोय करणे लघुउद्योजकांना शक्य नाही. त्यामुळे या परिस्थितीत अनेकांनी कंपन्या बंदच ठेवल्या आहेत” काही बड्या ऑटोमोबाईल कंपनींनी आपले काम कमी केली असल्याची माहिती काही लघुउद्योजकांनी दिली. रुग्णवाहिका, लष्करी वाहने, निर्यातीसाठीच्या वाहनांचे काम सुरु आहे. स्थानिक काम बंद ठेवण्यात आले आहे.
टाटा मोटर्स मध्येही निवडक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम:
टाटा मोटर्सने एका शिफ्टमध्ये काम करण्यास सुरूवात केल्याची चर्चा उद्योग नगरीत होती. त्या बाबत टाटा मोटर्सशी संपर्क साधला असता त्यांनी ब्रेक द चेन या अंतर्गत आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत असल्याचे सांगितले. कोरोनाच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. त्याच बरोबर स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने कंपनीतील ४५ वर्षांवरील कामगारांचे लसीकरण करण्यात येत असल्याचे टाटा मोटर्सने स्पष्ट केले.