Break the chain निर्बंधांचा उद्योगांना फटका. उत्पादनात चौदा टक्क्यांची घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 12:27 PM2021-05-03T12:27:48+5:302021-05-03T12:29:04+5:30
मराठा चेंबर चे सर्वेक्षण
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांचा पुणे आणि परिसरातल्या कंपन्यांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये कंपन्यांचे उत्पादन जवळपास 14 टक्क्यांनी आणि मनुष्यबळही 16 टक्क्यांनी घटल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर म्हणजे एम सी सी आय ए ने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
पहिल्या लॉकडाऊन पासून मराठा चेंबर च्या वतीने सातत्याने सर्वेक्षण केले जात आहे. त्यातील तेराव्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष रविवारी जाहीर करण्यात आले. या सर्वेक्षणात जवळपास दीडशे कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. मार्चमध्ये कंपन्यांची उत्पादन पातळी 83 टक्के होती तर कार्यरत मनुष्यबळ 86 टक्के होते पण यात घट होऊन एप्रिल मध्ये उत्पादन पातळी 69% आणि कार्यरत मनुष्यबळ 70 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या कंपन्यांपैकी 24 टक्के कंपन्यांनी कोरोना पूर्व काळातील उत्पादन पातळी गाठली आहे तर 19 टक्के कंपन्यांनी सावरायला आणखी तीन महिने तर 35 टक्के कंपन्यांनी साधारण तीन ते सहा महिने लागतील असा अंदाज वर्तवला आहे. 22 टक्के कंपन्यांनी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
याविषयी बोलताना एम सी सी आय ए चे अध्यक्ष सुधीर मेहता म्हणाले ," पुरवठ्याची साखळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे आणि त्यामुळे लघु तसेच अनौपचारिक उत्पादक यांच्याबाबत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे."