साखरदराच्या घसरणीला ब्रेक
By Admin | Published: December 19, 2015 03:05 AM2015-12-19T03:05:15+5:302015-12-19T03:05:15+5:30
अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २५० रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार
सोमेश्वरनगर : अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या साखरेच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. गेल्या १५ दिवसांत साखरेने क्विंटलमागे तब्बल २५० रुपयांची उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखानदार व ऊसउत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या साखर दरवाढीचा पहिली उचल देण्यासाठी चांगलाच हातभार लागेल.
साखरेचे दर १५ दिवसांपासून सुधारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य बँकेने अजूनही साखरेच्या मूल्यांकनात वाढ केलेली नाही. राज्य बँकेने साखरदर वाढताच साखरेच्या मूल्यांकनात वाढ करण्याची गरज असल्याचे मत ऊसउत्पादक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे पहिल्या उचलीच्या भिजत पडलेल्या घोंगड्याचा प्रश्न मार्गी लागेल. १ डिसेंबर रोजी राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात प्रतिक्विंटल ११५ रुपयांनी वाढ केली होती; त्यामुळे साखरेचे मूल्यांकन २,३८५ रुपयांवर गेले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांत साखरेच्या दरात २५० ते ३०० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली आहे. मात्र, साखरेचे दर घटल्यानंतर बँक मागील ३ महिन्यांच्या सरासरीचा विचार न करता लगेचच मूल्यांकन कमी करते. मात्र, साखरदर वाढल्यानंतर बँक तिच्या सवडीने मूल्यांकन वाढविते. त्यासाठी ३ महिन्यांच्या साखरेच्या दराची नियामावली लावत नाही. काल सोमेश्वर कारखान्यावर साखरेच्या झालेल्या निविदेला साखरेला २,७१५ तर उच्च प्रतीच्या साखरेला २,८३० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
एफआरपीसाठी कारखानदारांना दिलासा मिळणार
१ डिसेंबरपूर्वी जिल्हा बँक कारखानदारांना एका क्विंटलला २,२७० रुपये मूल्यांकन देत होते. यामध्ये ११५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या वर्षीपेक्षा साखरेच्या मूल्यांकनाची परिस्थिती या वर्षी चांगली आहे.
गेल्या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच साखरेच्या मूल्यांकनात वारंवार कपात करण्यात आली होती. मात्र, या वर्षी ११५ रुपयांनी वाढ केल्याने ते २,३८५ रुपयांवर गेले होते.
काल पुन्हा साखर २,८३० रुपये क्विंटलवर गेल्याने एफआरपी देण्यासाठी कारखानदारांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. राज्य बँकेने या वाढलेल्या साखरेचे मूल्यांकन
त्वरित वाढवावे, अशी मागणी ऊसउत्पादक करीत आहेत.
८०:२०एफआरपी फॉर्म्युला
यापूर्वीच मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी ऊसउत्पादकांना ९० टक्क्यांपर्यंत उचल देण्यास सांगितले होेते. त्याप्रमाणे राज्य बँकेने जर सध्याचे साखरेचे दर पाहता, २,५०० ते २,५५० पर्यंत साखरेचे मूल्यांकन करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे ऊसउत्पादकांना पहिली उचल १,८०० रुपये मिळणे शक्य होईल. एफाआरपी ८०:२० असा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीचा पहिला हप्ता ८० टक्क्यांप्रमाणे देण्यास कारखान्यांना फारसे अवघड जाणार नाही.
गेल्या १५ दिवसांपूर्वी राज्य बँकेने साखरेच्या मूल्यांकनात ११५ रुपये वाढ केली होती़ ती आम्ही तातडीने कारखान्यांना दिली़ आता जर शासनाने व राज्य बँकेने पुन्हा आदेश दिले तर त्वरित अंमलबजावणी करू़
- रमेश थोरात़, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक़