Monsson 2023: मान्सूनचा ‘ब्रेक’; पुण्यात कधी बरसणार? उकाड्याने पुणेकर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 01:16 PM2023-06-20T13:16:44+5:302023-06-20T13:16:59+5:30
जून महिना कोरडाच जाण्याची भीती..,
पुणे : यंदा पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे जून महिन्यातील सरासरी पावसाची नोंद झालेली नाही. अजून मान्सूनच पुण्यात आला नाही. पुढेही एक आठवडा तरी मान्सून येण्याची चिन्हे नाहीत. जून महिन्यात सरासरी शंभर मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मात्र आतापर्यंत केवळ २०.७ मिमीची नोंद झाली आहे. एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे उष्णतेने पुणेकर हैराण झाले असून, जून महिनाही कोरडाच जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने यंदा मान्सून उशिरा येणार असल्याचा अंदाज दिला होता. पण, एवढा उशीर करेल, याची कल्पना कोणालाच नव्हती. आता तर जूनचा अर्धा महिना ओलांडून गेला आहे. तरीही पावसाचे चिन्हं दिसत नाहीत. शहरात अजूनही दुपारी उन्हाच्या झळा आणि उकाडा जाणवत आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत अनेकदा सायंकाळी पावसाने हजेरी लावलेली. दुपारी उकाडा आणि सायंकाळी पावसाचा दिलासा, अशी स्थिती पुणेकरांनी अनुभवली. तापमानाचा पाराही चाळिशीच्या पार पोहोचला होता. जूनमध्ये साधारणपणे शंभर ते दीडशे मिमीच्या दरम्यान पावसाची सरासरी असते. यंदा मात्र विदारक चित्र आहे.
स्थानिक हवामानही बदलतेय :
पुणे जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दरवर्षीच्या पावसाची सरासरी साधारणपणे १२०८ मिमी होती. गेल्या काही वर्षांमध्ये यात बदल झाला आहे. आता ७५० ते ८०० मिमी पाऊस सरासरी पडतो. हवामान बदलाचा हा परिणाम असू शकतो. पुण्याच्या तापमानातही चढ-उतार पाहायला मिळत आहे. एरवी चाळिशी पार न जाणारे तापमान आता सर्रास ४० पार जात आहे.
हवामान विभाग म्हणते...
- पुण्यात पुढील दोन-चार दिवस दुपारी आकाश निरभ्र राहून उकाडा जाणवणार आहे.
- संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
मृग नक्षत्र कोरडेच !
दरवर्षी ७ जूनला मृग नक्षत्र असते. तेव्हा झालेला पाऊस हा अतिशय चांगला असतो. पावसाळ्यातील हे पहिले नक्षत्र आहे. शेतकऱ्यांना या मृगाची आस लागलेली असते. या नक्षत्रात पाऊस झाला की, पेरण्या केल्या जातात. पण, यंदा ते कोरडेच जात आहे. आता सर्वांचे लक्ष २१ जून रोजीच्या आर्द्रा नक्षत्रावर आहे.