घरे फोडा, पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच प्रमुख उद्योग; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

By राजू इनामदार | Published: May 31, 2024 08:29 PM2024-05-31T20:29:05+5:302024-05-31T20:29:28+5:30

पुण्याची सध्या होणारी बदनामी सरकारच्या निष्क्रियतेमुळे होत असून त्यावर हे गंभीर नाही

break political parties business of maharashtra government Supriya Sule targets the government | घरे फोडा, पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच प्रमुख उद्योग; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

घरे फोडा, पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच प्रमुख उद्योग; सुप्रिया सुळेंचा सरकारवर निशाणा

पुणे: पोर्शे अपघात प्रकरणात सरकारच्या वेगवेगळ्या खात्याकडून दररोज वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहेत. गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन गेले, त्यांनी कोणालाही सोडणार नाही असे सांगितले. मग आता त्यांनीच राज्याला व देशाला नक्की काय ते सांगावे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

अहिल्याबाई होळकर यांच्या सारसबाग येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सुळे शुक्रवारी दुपारी पुण्यात आल्या होत्या. त्यानंतर पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली. पुण्यात देशपरदेशातून मुले शिक्षणासाठी येतात. पण, इथे ड्रग्ज कल्चर सुरू झाले आहे. अपघात होत आहेत. ससूनमधून अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. पुण्याची ही बदनामी सरकारच्या निष्क्रियतेमुळे होत आहे. हे सरकार गंभीर नाही. घरे फोडा व पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच त्याचा उद्योग आहे असे सुळे म्हणाल्या.

हिंजवडी येथून आयटी उद्योग बाहेर जात आहेत, याकडे सुळे यांचे लक्ष वेधले असता त्या म्हणाल्या, हेही सरकारचेच अपयश आहे. शरद पवार यांनी जाणीपूर्वक हा आयटी उद्योग पुण्यात आणला. त्याचे एक स्वतंत्र मॉडेल तयार केले. आता ते सगळेच उद्ध्वस्त होत आहे, याचे कारण सरकारच गंभीर नाही. कांद्याचा निर्यात कर थांबवला ही फसवी घोषणा होती. आता कर्नाटकने ते केले, तर महाराष्ट्रात का नाही हे राज्य सरकारलाच विचारायला हवे.

ससून ही संस्था राज्यातील नव्हे, तर देशातील उत्कृष्ट संस्था आहे. तिथे मागील काही महिन्यात जे काही प्रकार घडले त्यात संस्थेचा नाही, तर तिथे राजकीय हस्तक्षेप होतो आहे, याचा दोष आहे. ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे तिथे सापडल्यानंतर आता पोर्शे अपघातासंदर्भातही तिथेच घोटाळे होत आहेत. याचे कारण राजकीय हस्तक्षेप हेच आहे, असा थेट आरोप सुळे यांनी केला. देवेंद्र फडणवीस ललित पाटील प्रकरणानंतरही पुण्यात आले होते व आता अपघातानंतरही आले. त्यांनीच कोणाला सोडणार नाही अशी घोषणा केली. मग आता राज्याला व देशाला या प्रकरणांमध्ये नक्की काय आहे ते सांगण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे असे सुळे म्हणाल्या.

Web Title: break political parties business of maharashtra government Supriya Sule targets the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.