आषाढी वारीच्या तयारीला आळंदीत ब्रेक; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा; प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 08:33 PM2020-06-10T20:33:10+5:302020-06-10T20:36:42+5:30
कोरोनामुळे यंदा पायी पालखी सोहळा रद्द करून माऊलींच्या चलपादुका मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीच्या दिवशी पंढरीला जाणार आहेत...
भानुदास पऱ्हाड -
आळंदी : माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान येत्या शनिवारी ज्येष्ठ वद्य अष्टमीला (दि. १३) होणार आहे. अर्थातच अवघ्या दोन दिवसांवर प्रस्थान सोहळा येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून प्रस्थान सोहळ्याला अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे देवस्थानने लेखी पत्राद्वारे प्रशासनाकडे प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी मागितलेली असतानाही प्रशासनाने कुठल्याही सूचना देवस्थानला दिलेल्या नाहीत. परिणामी देवस्थानकडून केल्या जाणाऱ्या प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला ब्रेक लागला आहे.
कोरोना संसर्गावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. यापार्श्वभूमीवर यंदा संत ज्ञानेश्वर माउलींचा पायीवारी सोहळा रद्द करून माऊलींच्या चलपादुका मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत हेलिकॉप्टर किंवा बसने दशमीच्या दिवशी पंढरीला जाणार आहेत. दरम्यान राज्य शासनाच्या सूचनेनुसार आळंदीतील माउलींचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद असणार आहे.
तत्पूर्वी शनिवारी (दि.१३) माऊलींच्या चल पादुकांचे साध्या पद्धतीने प्रस्थान होणार आहे. त्यासाठी संबंधित पन्नास जणांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देवस्थानने प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे. प्रशासनाने लवकरात - लवकर निर्णय घेऊन आदेश दिल्यास संबंधीत सोहळ्याची वेळेत तयारी पूर्ण होईल अशी अपेक्षा देवस्थांकडून व्यक्त होत आहे.
माऊलींचा आषाढी पायीवारी सोहळा म्हटलं की, लाखोंच्या संख्येने तीर्थक्षेत्र आळंदीत वारकरी दाखल होत असतात. प्रस्थान सोहळ्याच्या दोन - तीन दिवस आगोदर शहरात जिकडेतिकडे वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते. रात्रंदिवस टाळ - मृदुंगाचा निनादात कीर्तन, भजन, हरिपाठ ऐकू येतात. मात्र चालू वर्षी कोरोनाने वारकऱ्यांचा हा आनंद हिरावून घेतल्याने चित्र आहे.
...............................
माऊलींच्या चलपादुकांचे विधिवत प्रस्थान होईल. मात्र हा सोहळा किती जणांच्या उपस्थितीत संपन्न करायचा; याबाबत प्रशासनाकडून देवस्थानला कळविले जाईल. सध्या मंदिर परिसर कंटेन्मेंट झोनलगत असल्याने सोहळ्यादरम्यान विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
- संजय तेली, प्रांताधिकारी, खेड.