Lohgad Fort: लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील डोंगराला भेगा; भुस्खलन होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 04:23 PM2024-07-31T16:23:20+5:302024-07-31T16:23:55+5:30
डोंगराला भेगा गेल्याने भुस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत
पवनानगर: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातल्या किल्ले लोहगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराला भेगा गेल्याने भुस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. लोहगड गावात डोंगराला भेगा असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरडीच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भेगा दिसताच गुराख्यांनी ग्रामस्थांना सतर्क केले आहे. यावेळी गावकामगार तलाठी यांनी पाहणी केली आहे.
किल्ले लोहगड गडाच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड व धालेवाडी गावाला मोठा धोका निर्माण झाला आहे. लोहगड गावामध्ये सुमारे ५०० ते ६०० लोकवस्ती असलेले गाव असून तर धालेवाडी गावामध्ये २५० ते ३०० लोकवस्ती असलेले गाव आहे. याठिकाणी सन १९८९ साली मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन लोहगड येथील तीन ते चार घरे यामध्ये गाडली गेली होती. तर अनेक जनावरे मृत पावले होते. तसेच सन २००६ साली याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भुस्खलन होऊन धालेवाडी येथील शेतकऱ्यांची भात शेती यामध्ये गाडून गेली होती.
मागील झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे याठिकाणी डोंगराला भेगा पडल्याचे लोहगड किल्याच्या पायथ्याशी डोंगरावर जनावरांना चारा चारण्यासाठी नेलेल्या गुराख्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने सुरक्षेच्या सूचना दिल्याय आहे. प्रशासन ग्रामस्थांच्या संपर्कात असल्याचं तहसिलदार यांनी सांगितले आहे.
महसूल विभागामार्फत लोहगड येथील डोंगराला गेलेल्या भेगाची पाहणी
लोहगड येथील डोंगराला गेलेल्या भेगाची पाहणी प्रातंअधिकारी सुरेंद्र नवले,तहसिलदार विक्रम देशमुख, तलाठी शरद गाडे,गणेश धानिवले,राजु शेळके,पोलीस पाटील सचिन भोरडे,सरपंच सोनाली बैकर,उपसरपंच ज्योती धानिवले,विठ्ठल पाठारे यांनी पाहणी करुन वरिष्ठ कार्यालयाकडे कळविले आहे.
मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे आमच्या गावाच्या खालील बाजुच्या डोंगराला मोठ्या भेगा पडल्या असुन त्याठिकाणी माझा गाईचा गोठा आहे.मी गोठ्यावर गेलो तेव्हा मला जमीला भेगा गेल्याचे दिसले याबाबत मी सरपंच, उपसरपंच यांना माहिती दिली. त्यांनी तलाठी यांना बोलावून पाहणी केली आहे. यावेळी माझ्या गोठ्याच्या भितीला पण तडा गेला असल्याचे दिसले. शासनाने लवकरात लवकर पाहणी करुन आम्हाला वाचवण्यासाठी प्रयत्न करावे. -राजु शेळके, लोहगड रहिवासी
मी व प्रांतसाहेबांनी लोहगड येथील डोंगरावर गेलेल्या भेगांची पाहणी केली असुन याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविले असुन नागरिकांना सुचना दिल्या आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. - विक्रम देशमुख, तहसीलदार मावळ