निधी मिळूनही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:32+5:302021-06-05T04:08:32+5:30
कोरेगाव भीमा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामास जागेअभावी पाच वर्षांपूर्वी गती मिळाली नव्हती. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये भूमिपूजन ...
कोरेगाव भीमा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामास जागेअभावी पाच वर्षांपूर्वी गती मिळाली नव्हती. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये भूमिपूजन झाले, पण निधी परत केला. त्यानंतर आता याही वर्षी या आरोग्य केंद्राच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पण स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आरोग्य केंद्राच्या कामाला मुहूर्त मिळेनासे झाले आहे.
कोरेगाव भीमासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात २०१४-१५ साली डेंग्यू रोगाने थैमान घातले होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी तात्पुरता दवाखानाही सुरू करण्यात आला होता. कोरेगाव भीमा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर आरोग्य केंद्र मंजूर होऊन निधीही पडला होता. ४ जानेवारी २०१६ रोजी कोरेगाव भीमा येथील वाढीव गावठाणमध्ये आरोग्य केंद्राचे भूमिपुजन करण्यात आले. या वेळी काम सुरु होईल असे वाटत असतानाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नावावर प्रत्यक्षात जागा नसल्याने पाठपुरावा करून ८० गुंठे जागा आरोग्य केंद्रासाठी आरक्षित करून त्याचा मोजणी नकाशाही जिल्हा परिषदेकडे ग्रामपंचायतीच्या वतीने दिला होता. मात्र तोपर्यंत सदर निधी परत गेल्याने पुन्हा कोरेगाव भीमामध्ये आरोग्य केंद्र होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली होती.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या वर्षी जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे यांनी पाठपुरावा करुन कोरेगाव भीमा प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळविली आहे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींना आरोग्य केंद्राचा विषय मार्गी लावण्यासाठी मुहूर्त मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
कोरेगाव भीमा प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे. आरोग्य केंद्रासाठी मोठा निधी आवश्यक असल्याने राज्य शासनाकडून त्यावर निधी मिळाला की तत्काळ काम सुरू करण्यात येईल.
कुसुम मांढरे, सदस्या, जिल्हा परिषद पुणे
कोरेगाव भीमा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागेची अडचण दूर करण्यात आली असून मोजणी नकाशाही तयार झाला आहे. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत आरोग्य केंद्राचे काम सुरू करण्यात येईल.
अमोल गव्हाणे, सरपंच, कोरेगाव भीमा