Pune: मदतीला जाणाऱ्या ब्रेकडाऊन बस पेटली; नाना पेठेतील संत कबीर चौकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 09:10 AM2023-11-01T09:10:11+5:302023-11-01T09:10:38+5:30

गाडीतील अंतर्गत वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची दुर्घटना घडल्याचे प्राथमिक पाहणीत निष्पन्न झाले...

Breakdown bus on way to help catches fire; Incident at Sant Kabir Chowk in Nana Peth | Pune: मदतीला जाणाऱ्या ब्रेकडाऊन बस पेटली; नाना पेठेतील संत कबीर चौकातील घटना

Pune: मदतीला जाणाऱ्या ब्रेकडाऊन बस पेटली; नाना पेठेतील संत कबीर चौकातील घटना

लष्कर (पुणे) : बंद पडलेल्या पीएमटीच्या मदतीसाठी जाणाऱ्या ब्रेकडाऊन बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. ही घटना नाना पेठ येथील संत कबीर चौकात सायंकाळी ७.१५ च्या सुमारास घडली. गाडीतील अंतर्गत वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याची दुर्घटना घडल्याचे प्राथमिक पाहणीत निष्पन्न झाले.

याबाबत अधिकची माहिती अशी की सायंकाळी ६.३० ला स्वारगेट येथील पीएमटीच्या मुख्य कार्यालयात पुणे रेल्वे स्टेशन येथे पीएमटी बस बंद पडल्याचा कॉल आला होता. त्यानंतर स्वारगेट येथील मुख्य आगारातून ती बस दुरुस्त करण्यासाठी ब्रेक डाऊन बस (एमएच १२ क्यूजी १६७१) रवाना झाली, ती नाना पेठेतील संत कबीर चौकात आली असताना अचानक बंद पडली. त्या बसला धक्का मारताना बसखालील अंतर्गत वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाले आणि बसने पेट घेतला.

बसचालक आणि स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली व २० मिनिटे पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी अमोल तुजारे यांनी दिली.

पोलिसांनी टाकला सुटकेचा नि:श्वास

सध्या राज्यभर मराठा आरक्षणविषयी आंदोलन सुरू आहे. रस्त्यावरचाच हा भाग तर नाही ना, असे पोलिसांना सुरवातीला वाटले. मात्र पोलिसांना फोन करणारे अमोल तुजारे यांनी स्वतः घडलेली घटना हा केवळ अपघात असल्याचे सांगितल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.

मदत करणाऱ्याला जेव्हा मदतीची गरज लागते

खरे तर अपघातग्रस्त ब्रेकडाऊन बस ही पुणे रेल्वे स्थानक येथे बंद पडलेल्या दुसऱ्या बसच्या मदतीसाठी रवाना झाली होती. अचानक ती बंद पडून ढकलताना तिचा अपघात झाला. बसला इतकी मोठी आग लागू शकते ही अतिशय गंभीर गोष्ट असून त्यामुळे पीएमपीएमएलचे पुन्हा एकदा वाभाडे निघाले आहे. ब्रेकडाऊन बसला इतकी भीषण आग लागत असेल तर ती प्रवासी बसलाही ती लागू शकते; त्यामुळे त्या साऱ्या बसची पुन्हा तपासणी केली जावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

सदरची आग ही शॉर्ट सर्किटने लागली. हा केवळ अपघात आहे. अपघातामुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना झालेली नाही.

- डी. आर. दांगट (चेकर, पी एम टी)

Web Title: Breakdown bus on way to help catches fire; Incident at Sant Kabir Chowk in Nana Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.