जेजुरी वीज उपकेंद्रात बिघाड; बारामतीच्या नऊ गावांना केवळ एक तास वीज मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 11:08 AM2021-03-05T11:08:40+5:302021-03-05T11:36:38+5:30
जेजुरी येथील वीज उपकेंद्रामध्ये बिघाड झाला आहे.
मोरगांव : जेजुरी उपकेंद्रामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बारामती तालुक्यातील लोणी भापकर व मोरगाव बिट अंतर्गत येणाऱ्या ९ गावांना तसेच पुरंदर तालुक्यातील १० गावांना पुढील दोन दिवस थ्री फेज पुरवठा दिवसातील फक्त एक तास होणार आहे. जेजुरी (४०० के.व्ही ) उपकेंद्रावरुन मुख्य विज वाहीनी बारामती तालुक्यातील लोणी भापकर उपकेंद्र ( ३३/११ ) , मोरगांव व पुरंदर तालुक्यातील पिसर्वे उपकेंद्रामध्ये येते.
जेजुरी येथील वीज उपकेंद्रामध्ये बिघाड झाला आहे. यामुळे पळशी,सायंबाची वाडी, लोणी (शिंदे मळा) ३ फेज पुरवठा दिवसातून फक्त १ तास पिण्याचे पाणी भरुन घेण्यासाठी मिळणार आहे . तर मोरगांव उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या मोरगाव , तरडोली , मुर्टी , मोढवे , जोगवडी व आंबी या सहा गावांना दिवसातील एक तास विज पुरवठा होणार आहे .
तसेच पुरंदर तालुक्यातील पिसर्वे उपकेंद्रा अंतर्गत पिसर्वे , मावडी पिंपरी, नायगाव टेकवडी, राजुरी, रिसेपिसे , माळशिरस , राजेवाडी ,पोंढे या दहा गावांचा सलग दोन दिवस थ्री फेज वीजपुरवठा खंडीत होणार आहे . पिण्याचे पाणी भरण्यासाठी वरील गावांना दिवसातील केवळ एक तास थ्री फेज पुरवठा सुरु केला जाणार आहे . तर सिंगल फेज सुरळीत सुरु राहणार आहे . जेजुरी सब स्टेशनचे काम युद्धपातळीवर सूरु असल्याने कदाचीत आजच दुरुस्ती पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहीती मोरगाव महावितरण कंपनीचे शाखा अभीयंता नाळे यांनी दिली .