नोटबंदीमुळे नवीन वाहन विक्रीला ब्रेक
By admin | Published: November 17, 2016 03:37 AM2016-11-17T03:37:32+5:302016-11-17T03:37:32+5:30
आठ दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या आहेत़ त्यामुळे नोटाबंदीचा परिणाम आता दुचाकी आणि चारचाकी शोरूममालकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे.
पिंपरी : आठ दिवसांपूर्वी केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या आहेत़ त्यामुळे नोटाबंदीचा परिणाम आता दुचाकी आणि चारचाकी शोरूममालकांना त्याचा चांगलाच फ टका बसत आहे़ विविध स्कीम देऊनही ग्राहकांनी गेल्या आठ दिवसांपासून दुचाकी आणि चारचाकी वाहनांची साधी चौकशीही केली नसल्याची माहिती मालकांनी दिली आहे़ नोटाबंदीमुळे ग्राहकांनी सुमारे साठ ते सत्तर टक्के नवीन वाहन खरेदी करण्याचे नियोजन थांबविले. त्यामुळे ग्राहकांना वाहन विकत घेण्यासाठी कसे आकर्षित करायचे असा प्रश्न शोरूममालकांना पडला आहे़
काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने ८ नोव्हेंबरपासून चलनातील पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्या आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून ते श्रीमंत लोकांपर्यंत अनेकांनी विविध खरेदीला लगाम घातला आहे़ अनेकांनी दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची खरेदीसाठी नोंदणी केली होती़ मात्र, विविध शोरूममध्ये पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जात नाही़ गाडी घेण्यासाठी धनादेश, शंभराच्या नोटा आवश्यक आहे़ एवढी मोठी रक्कम एकदम भरणे शक्य नसल्यामुळे नागरिकांनी गाड्यांचे नियोजन पुढे ढकलल्याची माहिती शोरूम मालकांनी दिली़
मागील महिन्यापर्यंत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची चौकशी करण्यासाठी दिवसभरात साधारणपणे आठ ते दहा ग्राहक शोरूममध्ये येत होते़ पण गेल्या आठ दिवसांपासून नोटाबंदीच्या निर्णयानंतर दिवसात एक किंवा दोन ग्राहक जुजबी माहिती घेण्यासाठी शोरूममध्ये येत असल्याची माहिती मालकांनी दिली़ त्यामुळे वाहन विके्रत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे़ अनेक ग्राहक जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा घेऊन वाहनांची खरेदी करण्यासाठी येत आहेत़ या नोटा न स्वीकारल्याने शोरूममालक आणि ग्राहक यांच्यात असणारे संबंध ताणले जात आहेत़ त्यामुळे भविष्यातील व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे़ एरवी ग्राहकांना वाहनांची माहिती देताना शोरूममधील कामगार व्यस्त असायचा; मात्र, काही दिवसांपासून ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद आहे.(प्रतिनिधी)