जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम, 'मविआ' मध्ये आलबेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 06:26 PM2024-11-04T18:26:14+5:302024-11-04T18:27:14+5:30
महायुती, महाविकास आघाडी, वंचित बघून आघाडी आणि दोन अपक्ष उमेदवार अशा ५ उमेदवारांमुळे लढतीत चांगलीच रंगत निर्माण झालीये
जुन्नर : पुणे शहराच्या ८ विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या बंडखोरीने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. तर ग्रामीण भागात महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडे बंडखोरी कायम ठेवल्याचे दिसून आले आहे. जुन्नरच्या विधानसभा मतदार संघात महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेना शिंदे गटाचे शरद सोनवणे, भाजपनेत्या आशाताई बुचके यांनी अपक्ष म्हणुन उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पुढे आले आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर (माऊली )खंडागळे यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र पुढे आले आहे.
जुन्नर विधानसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते .यापैकी सहा उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. निवडणूक रिंगणात ११ उमेदवार उरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अतुल बेनके,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार सत्यशील शेतकर , वंचित आघाडीचे देवराम लांडे , प्रमुख अपक्ष उमेदवार माजी आमदार शरद सोनवणे , आशाताई बुचके या पाच उमेदवारांसह इतर सहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आशाताई बुचके व शरद सोनवणे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने पंचरंगी झालेल्या या लढतीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर (माऊली )खंडागळे जुबेर अस्लम शेख ,योगेश तोडकर, काळू गागरे ,रमेश पाडेकर, निलेश भुजबळ या उमेदवारांनी माघार घेतली आहे.